दि. ५ ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेस च्यावतीने “संविधान बचाव अभियानाला” सुरुवात देहूरोड, विकासनगर येथून काल (दि. ०३ मे) करण्यात आली. दि. ०३ ते ३० मे, २०२५ पर्यंत शहरात राबविण्यात येणाऱ्या अभियानाची माहिती कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पुढीलप्रमाणे दिली. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. शहरातील विविध भागातील मुख्य चौकातुन दि. ३ ते ११ मे २०२५ या कालावधीत संविधान बचाव अभियाना अंतर्गत सभाचे आयोजन करण्यात आले आहे. या सभांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाचे अपयश जनतेच्या निदर्शनास आणुन तसेच वाढती बेरोजगारी, महागाई, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शासनाने दिलेल्या आश्वासनांची न झालेली पुर्तता व अशा अनेक कारणांमुळे नागरिकांना होणारा त्रास याकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
शहरी भागामध्ये नागरिकांचे अनेक प्रश्न असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका न झाल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात बोकाळलेला प्रचंड भ्रष्टाचार आणि अनियमितता व त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा मनस्ताप यासंदर्भात आवाज उठविणे गरजेचे आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वच्छतेचे अनेक प्रश्न निर्माण झाले असून योग्य नियोजन नसल्यामुळे शहर दिवसेंदिवस बकाल होत चालले आहेत. या प्रश्नांबाबत सुध्दा आवाज उठवून सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
विधानसभा स्तरीय संविधान बचाव पदयात्रा या अभियानाच्या दूसऱ्या टप्प्यात तिन्ही विधानसभानिहाय संविधान बचाव पदयात्राचे आयोजन दि.१२ ते २० मे २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. यावेळी केंद्र व राज्य शासनाचे विविध क्षेत्रातील अपयश तसेच ईडी, सीबीआय सारख्या केंद्रिय संस्थांच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांना गैरकायदेशीरपणे देण्यात येणारा त्रास, तसेच दलित वर्ग, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक आणि महिला वर्गाच्या प्रश्नांकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष व समाजामध्ये निर्माण होत असलेले असंतोष या प्रश्नांवर या पदयात्रेमध्ये चर्चा घडवून आणण्यात येणार आहे.
घर घर संपर्क अभियान या अभियानाच्या तिसऱ्या व शेवटच्या टप्प्यात प्रत्येक घराघरांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद प्रक्रिया करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दि. २१ ते ३० मे २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक बुथवरील नेते मंडळी, कार्यकर्ते यांना सक्रिय करुन त्यांच्या माध्यमातून त्या बुथमधील प्रत्येक कुटूंबाशी संपर्क साधण्यात येणार आहे. वाढती महागाई, बेरोजगारी, महिला वर्गाचे प्रश्न, वाढती गुन्हेगारी तसेच आपल्या भागातील इतर ज्वलंत प्रश्नांबाबतची माहिती पत्रके तयार करुन त्याचे वाटप घरोघरी करण्यात येणार आहे. घर घर संपर्क अभियानाच्या दरम्यान नागरिकांशी जास्तीत जास्त संपर्क करण्यात येणार आहे.
यावेळी शहराध्यक्ष डॉ.कैलास कदम, श्यामला सोनवणे, मयूर जयस्वाल, अॅड.अनिरुध्द कांबळे, अबूबकर लांडगे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, केनिथ रेमी, तुषार पाटील, बाबासाहेब बनसोडे, अर्चना राऊत, मिलिंद फडतरे, महेश पाटील, मकरध्वज यादव, राहुल शिंपले, राजू ठोकळ, सोनू शेख, गौतम ओव्हाळ, चंद्रशेखर हौन्शाळ, गफूर शेख, मुन्ना कुरेशी, नियामत खान, मलिक शेख, आसिफ सय्यद,परशुराम दोडमनी,अन्वर तांबोळी, गौस सोनार, कृष्णा मुर्गेशन, जरीन नाडार, हाफिज अनवर, धनलक्ष्मी अम्मा, गीता तेलंग, ज्योती पोरे, सारिका नगराळे, माई चव्हाण, कीर्ती टकले, शैलेश्री सदापुरे, दीपा आचारी, अर्चना तेलुगु, वैशाली कसनगर, प्रिया जाधव, अमित मोरे, अभिजीत जाधव, साहिल पवार वगैरे मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या अभियानाच्या सुरूवातीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.













































