समाजाचा दुटप्पीपणा – एक वेदनादायक वास्तव

0
5

डॉ अनुपम टाकळकर

दि. ५ ( पीसीबी ) – दीनानाथ रुग्णालयात नुकताच घडलेला प्रसंग केवळ एका डॉक्टरसाठीच नव्हे, तर संपूर्ण वैद्यकीय समुदायासाठी एक अस्वस्थ करणारा अनुभव ठरला आहे. डॉ. घैसास यांनी गर्भवती महिलेच्या केसमध्ये प्रसूतीपूर्वच अंदाज वर्तवून सांगितले की बाळे वेळेपूर्वी (preterm) जन्म घेतील व त्यांना नवजात अतिदक्षता विभागात (NICU) उपचारांची गरज भासेल. त्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च येईल असा अंदाज होता, व त्यापैकी १० लाख रुपये आगाऊ भरावे लागतील, असे स्पष्टपणे सांगण्यात आले.

मात्र माध्यमांनी यावर सनसनाटी मथळे दिले — “खाजगी रुग्णालयाचा लुटीचा डाव,” “डॉक्टरांनी मागितले दहा लाख!” समाजानेही लगेच निष्कर्ष काढले. सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये डॉक्टरांवर चिखलफेक केली गेली. रुग्णालय बदलण्यात आले. शेवटी दुर्दैवाने महिला रुग्णाचे निधन झाले.

पण सगळ्यात मोठी विडंबनात्मक बाब म्हणजे — मुख्यमंत्री निधीतून त्या रुग्णासाठी जवळपास तोच खर्च मंजूर झाला, जो डॉक्टरांनी अंदाजे सांगितला होता! आता कोणीही त्या डॉक्टराच्या समर्थनार्थ पुढे येत नाही. ना माध्यमं, ना समाज. सुरुवातीस अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या समाजाने आता शांतता स्वीकारली आहे.

हा फार मोठा विरोधाभास आहे.

जेव्हा डॉक्टर प्रामाणिकपणे खर्च सांगतो, तेव्हा तो “लुटारू” ठरतो. पण तेच पैसे सरकार देतं, तेव्हा त्यात कुठेही शंका घेतली जात नाही. हे केवळ एका डॉक्टरवर अन्याय नाही, तर एकूणच वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारं आहे.

आज जर एखादा डॉक्टर खर्च आधीच न सांगता नंतर सांगतो, तर तो “चोर” ठरतो. आणि जर तो आधी सांगतो, तर तो “व्यावसायिक” ठरतो. डॉक्टरने काय करावा मग?

हा प्रश्न फक्त डॉ. घैसास यांचाच नाही. हा आपल्या समाजातील “तुम्ही कितीही चांगलं केलं, तरी चुकीचेच ठरवलं जाईल” या मानसिकतेचा आरसा आहे.


डॉक्टरही माणूस असतो. कृपया त्याचा आवाज ऐका. त्याच्या बाजूनेही उभं रहा. समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की -आपण सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा — नुसती हेडलाइन वाचून कोणावरही न्यायालय उभारू नये.


खरंतर, डॉक्टर म्हणजे देव नाही — पण त्याच्याकडून सगळ्यांना देवासारख्याच अपेक्षा असतात.
तो दिवस-रात्र रुग्णासाठी धावतो, प्रत्येक कॉलवर धडपडतो, रात्री अपरात्री ऑपरेशन थिएटरमध्ये घामाघूम होतो,
त्याच्या एका निर्णयावर एखाद्याचं जीवन अवलंबून असतं — आणि तरीही तो आर्थिक अंदाज द्यायला ‘समाजाच्या दृष्टीने’ चुकलाच, तर तो “गुन्हेगार” ठरतो!

कोणी विचारतं का —
डॉक्टर किती मानसिक तणावात आहे? त्याला किती झोप मिळते?
त्याच्या कुटुंबासोबत तो किती वेळ घालवतो?

मोठ मोठ्या रुग्णालयात काम करताना डॉक्टरांचा “शेअर” म्हणजे —
कित्येकदा फक्त जबाबदारी, अपेक्षा आणि दोषांचाच मोठा वाटा!
आर्थिक वाटपात त्याचं प्रमाण कमी, पण चुकीच्या परिणामात त्याच्यावर सर्वांत मोठ बोट!


एका बाजूला रुग्ण वाचवायची झपाटून लागलेली धडपड,
आणि दुसऱ्या बाजूला समाजाची सततची संशयाची नजर!!

हे सगळं करताना तो स्वतःची झोप गमावतो,
आराम गमावतो, कधी कधी स्वतःचीच आयुष्याची शांती गमावतो.

आणि त्याच वेळी समाज म्हणतो — “डॉक्टर पैसा कमावतात!”
अहो, पैसा कुठेही मिळवता येतो — पण
माणसाचा जीव वाचवणे केवळ डॉक्टरच करू शकतो


थोडकंच काय, आता वाटतं — डॉक्टर होणं म्हणजे आयुष्यभराची शिक्षा स्वेच्छेने स्वीकारणं- असा आमचा समज व्हायची वेळ आणू नका!!