माजी नगरसेवक शाम लांडे यांच्या प्रयत्नातून साकारणार भव्य राजमाता जिजाऊ व बाल शिवराय शिल्प स्मारक प्रकल्प
पिंपरी, दि. ५ – पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेच्या प्रांगणात भव्य शिवस्मारक उभारण्यात येत आहे. यामध्ये राजमाता जिजाऊ व बाल शिवराय यांचा पुतळा समाविष्ट आहे. संपूर्ण देशाचे आराध्य दैवत, ऊर्जा स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा प्रभाव आजच्या तरुण पिढीवर असणे आवश्यक आहे. या उद्देशाने कासारवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेच्या आवारात बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या स्मारक उभारण्यात येत आहे.
सदर प्रकल्पासाठी ३ कोटी ९२ लाख निधीची महानगरपालिकेकडून तरतूद करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्थापत्य विभागाच्या मार्फत हा प्रकल्प राबवला जात आहे.
स्मारकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक दत्तात्रय लांडगे, माजी स्थायी समिती सदस्य शाम लांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
असा असेल शिवस्मारक प्रकल्प
स्मारकाची उंची ६ फूट एवढी असून मेघडंबरीची उंची १५ फूट इतकी आहे शिल्प चौथरा अष्टकोनी असून यामध्ये शिल्पाच्या मागील बाजूस संस्कारसृष्टी उभारली जाणार आहे. यामध्ये राजमाता जिजाऊ या बाल शिवरायांवर संस्कार करताना शिल्प प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. हे शिल्प शिल्पकार मिलिंद किर्दत घडवत आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन अखिल एक गाव एक शिवजयंती समिती व माजी नगरसेवक श्याम लांडे मित्रपरिवार यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी उस्ताद बाळासाहेब लांडगे, माजी नगरसेवक रामभाऊ पिंपळे, ज्ञानेश्वर थोरात, रतन लांडगे, रवी लांडगे, सुनील लांडगे, अमोल मोटे, अशोक पगारिया, विलास पगारिया, रमेश लांडगे, तुकाराम जवळकर, बापू भोसले, ज्ञानेश्वर लांडे, सहादु भालेकर, रोहिदास चव्हाण, वसंत बोरा, लघुउद्योजक संघटना अध्यक्ष संदीप बेलसरे, दत्ता पवार, सोमेश्वर जौंजाळ, ज्ञानेश्वर कवडे, दादासाहेब रसाळ, सलीम तनवर, अतुल दौंडकर, रुपेश चव्हाण, स्वप्निल चौधरी, विकी मस्के, चेतन मेस्ता, गणेश लांडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
राजमाता जिजाऊंचे संस्कार प्रत्येक कुटुंबातील मुलावर व्हावेत या विचारानुसार प्रेरित होऊन विद्यार्थी घडावेत यासाठीच शालेय आवारात या शिल्पाचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न होत आहे. डिसेंबर अखेर स्मारकाचे कामकाज पूर्ण करून १२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंती साजरी करण्याचा मानस आहे,असे माजी नगरसेवक शाम लांडे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहरातील हा ऐतिहासिक प्रकल्प राबविण्यात येत आहे. सर्वांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचे स्मारक येथे उभारले जात आहे. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश बहल यांनी म्हटले.