पिंपरी, दिनांक : ०३ मे २०२५ ( पीसीबी ) –ट ‘संभाजीमहाराज म्हणजे सतराव्या शतकातील प्रभू रामचंद्र होत!’ असे प्रतिपादन शिवव्याख्याते नीलेश भिसे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक ०२ मे २०२५ रोजी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित चार दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘धर्मरक्षक छत्रपती संभाजीमहाराज’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफताना नीलेश भिसे बोलत होते. पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, टीजेएसबी बँकेचे भूषण वझे, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजीमहाराज प्रतिमापूजन आणि सामुदायिक शिववंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राजाभाऊ गोलांडे यांनी मनोगतातून, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या पुढाकारातून पिंपरी – चिंचवडमध्ये व्याख्यानमालेचा प्रारंभ झाला. त्यापासून प्रेरणा घेऊन या उद्योगनगरीत सुमारे तीस व्याख्यानमाला कार्यरत आहेत. पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीच्या माध्यमातून त्यामध्ये सुसूत्रीकरण साधले जाते.’ अशी माहिती दिली.
नीलेश भिसे पुढे म्हणाले की, ”छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या मनात संभाजीमहाराज यांच्या चरित्राविषयी उत्सुकता जागृत झाली. कितीही धर्मनिरपेक्षतेचा आव आणला तरी संभाजीमहाराजांचे बलिदान हे हिंदू धर्मासाठीच होते, ही गोष्ट मनात ठसल्याशिवाय राहत नाही. अखंड भारताचे स्वप्न शिवाजीमहाराज यांनी पाहिले अन् ते पूर्ण करण्यासाठी संभाजीमहाराज यांनी अथक प्रयत्न केले. प्रभू रामचंद्र यांनी पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी वनवास पत्करला; तर संभाजीमहाराज यांनी धर्मरक्षणासाठी प्राणाचे बलिदान दिले. वयाच्या दुसर्या वर्षी त्यांना आईचा वियोग सहन करावा लागला. पुरंदरच्या तहातील अटीनुसार वयाच्या आठव्या वर्षी शत्रूकडे ओलिस राहावे लागले. मिर्झाराजे जयसिंग यांच्यासोबत ते मुस्सदेगिरी शिकले; तर आग्रा येथे हजरजबाबी वक्तृत्वाचे धडे गिरवले. वयाच्या पंधराव्या वर्षी दहा हजार फौजेचे नेतृत्व त्यांनी केले; तर मथुरा येथे संस्कृतचे अध्ययन करून वयाच्या सतराव्या वर्षी ८२२ संस्कृत श्लोकांचा ‘बुधभूषण’ हा राजकारणावरील ग्रंथ लिहिला. पंडित गागाभट्ट यांनी ‘समयनय’ हा आपला संस्कृत ग्रंथ संभाजीमहाराज यांना अर्पण केला होता, इतकी त्यांची विद्वत्ता मोठी होती. आशिया खंडातील सर्वात क्रूर अन् कपटी असलेला औरंगजेब बादशहा पाच लाखांची फौज घेऊन हिंदवी स्वराज्य नष्ट करण्यासाठी जातीने चालूच आला होता. औरंगजेब आणि संभाजीमहाराज
यांची एकूण १८७ वेळा समोरासमोर भेट झाली होती; परंतु औरंगजेबाला त्यांचे अन् विशेषत: त्यांच्या डोळ्यांचे भय वाटत असे. संभाजीमहाराजांनी गनिमी कावा अन् आक्रमक युद्धनीतीचा अवलंब करून आपल्या कारकिर्दीत
एकूण १३५ लढाया केल्या. १६ जानेवारी १६८१ रोजी झालेल्या राज्याभिषेकानंतर केवळ पंधरा दिवसांनी बऱ्हाणपूर आणि खडकी (आताचे संभाजीनगर) येथील मोहिमेत त्यांनी खूप मोठी संपत्ती स्वराज्याच्या खजिन्यात जमा केली होती. रामशेज हा किल्ला साडेपाच वर्षे झुंजवत ठेवला होता. औरंगजेबाच्या विरोधात आदिलशाही आणि कुतूबशाहीशी संधान साधून राजकीय मुत्सद्देगिरीची खेळी खेळली. पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्धी यांच्याविरुद्ध मोहिमेतून त्यांना जरब बसवली. मर्दनगड या किल्ल्याची उभारणी केली. संभाजीमहाराज यांनी रामसिंग याला लिहिलेले महत्त्वाचे पत्र उपलब्ध झाले असून त्यावरून त्यांच्या चाणाक्ष युद्धनीतीवर प्रकाश पडतो. ०१ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे त्यांना कपटाने कैद करण्यात आले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार आणि अवहेलना करण्यात आली; पण सर्व काही निडरपणे सोसून संभाजीराजे यांनी आपला धर्म सोडला नाही. अखेर ११ मार्च १६८९ रोजी त्यांनी बलिदान स्वीकारले. संभाजीमहाराज यांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन स्वराज्याचे मराठी साम्राज्यात रूपांतर झाले!’ चित्रफितीच्या साहाय्याने नीलेश भिसे यांनी विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करीत शाहीर योगेश यांचे कवन सादर करून व्याख्यानाचा समारोप केला.
शैलेश भिडे आणि शीतल गोखले यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. संपदा पटवर्धन यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.