पाकड्यांची अण्वस्त्रांची धमकी अमेरिकेचा हस्तेक्षप

0
15

इस्लामाबाद, दि. २ ( पीसीबी ) –  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. दोन्ही देशांत युद्ध होण्याची शक्यता दिवसागणिक वाढत आहे. सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र संपन्न देश असल्यानं त्यांच्यातील तणाव जागतिक चिंतेचा विषय आहे. अण्वस्त्रांचा वापर न करण्याची भारताची भूमिका आहे. तर पाकिस्तान सरकारकडून सातत्यानं अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आमच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाल्यास अण्वस्त्रांचा वापर करु, अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वीच दिली आहे. पाकिस्तान सरकारमधील आणखी एक मंत्री हनीफ अब्बासी यांनीदेखील अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. शाहीन आणि गजनवी यांच्यासह १३० अण्वस्त्रं आम्ही भारताच्या दिशेनं वळवली असल्याचं अब्बासी म्हणाले होते.

पाकिस्तानमध्ये जबाबदार पदांवरील नेते सातत्यानं बेजबाबदार विधानं करत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाल्यास अण्वस्त्रांचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांची अधिक चिंता आहे. त्यामुळे मोठा धोका निर्माण झाल्यास अमेरिका पाकिस्तानची अण्वस्त्रं जप्त करु शकतो. त्यासाठीची आपत्कालीन योजना पाकिस्ताननं तयार केलेली आहे.
२०११ मध्ये एनबीसी न्यूजनं त्यांच्या वृत्तात अमेरिकेच्या आपत्कालीन योजनेची माहिती दिली होती. पाकिस्तानची अण्वस्त्रं ताब्यात घेण्याची अमेरिकेनं तयार करुन ठेवलेली आहे. पाकिस्तानची अण्वस्त्रं अमेरिकेसाठी आणि अमेरिकेच्या हितांसाठी धोकादायक आहेत, असं ज्यावेळी अमेरिकेच्या अध्यक्षांना वाटेल, तेव्हा आपत्कालीन योजना वापरली जाईल. परिस्थिती प्रचंड प्रमाणात बिघडल्यास योजनेचा अवलंब करण्यात येईल. पाकिस्ताननं आगळीक केल्यास त्यांच्या अण्वस्त्रांची सुरक्षा निश्चित करण्याला अमेरिकेचं प्राधान्य असेल.

एनबीसीच्या वृत्तात काही महत्त्वाचे मुद्दे होते. अमेरिकेला आपत्कालीन योजना अंमलात आणायची असल्यास त्यासाठी काही विशिष्ट निकष विचारात घेतले जातील. अंतर्गत अराजकता, अण्वस्त्र सुविधांवर गंभीर दहशतवादी हल्ला, भारतासोबतचा तणाव किंवा इस्लामी कट्टरतावाद्यांकडे सरकार किंवा पाकिस्तानी लष्कराचं नेतृत्त्व या मुद्द्यांचा समावेश होता.