दि . १ ( पीसीबी ) – गेली तीन वर्षे सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील विनाशकारी संघर्षातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर घटना समोर आली आहे. युक्रेनी पत्रकार व्हिक्टोरिया रोशचिना यांचा रशियन सैन्याच्या कैदेत असताना भीषण छळ करून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. २०२३ मध्ये त्यांना वार्तांकन करत असताना ताब्यात घेण्यात आले होते.
२७ वर्षीय व्हिक्टोरिया रोशचिना या व्यापलेल्या जापोरिज्जिया प्रदेशात युक्रेनी नागरिकांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांबाबत सत्य शोधून काढण्याचे धाडसी काम करत होत्या. याच दरम्यान २०२३ साली रशियन सैनिकांनी त्यांना अटक केली. अटकेनंतर त्यांना प्रथम मेलिटोपोल आणि नंतर रशियातील टॅगानरोग येथील तुरुंगात पाठवण्यात आले; हे तुरुंग कैद्यांवर होणाऱ्या क्रूरतेसाठी ओळखले जाते.
समोर आलेल्या माहितीनुसार,टॅगानरोग येथील सुमारे आठ महिन्यांच्या कैदेत व्हिक्टोरिया यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. यामध्ये इलेक्ट्रिक शॉक देणे, हाडे मोडणे, नशेची औषधे देणे, उपाशी ठेवणे आणि इतर अनेक प्रकारच्या छळाचा समावेश होता. या असह्य यातनांनंतर अखेरीस सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
मृतदेहाची ओळख आणि अत्याचाराचे उघड वास्तव-
फेब्रुवारी २०२५ मध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेल्या कैद्यांच्या अदलाबदली दरम्यान, व्हिक्टोरिया यांचा मृतदेह युक्रेनला सोपवण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे, तो ‘अज्ञात पुरुष’ म्हणून देण्यात आला होता. तथापि, डीएनए (DNA) चाचणीद्वारे त्यांची खरी ओळख पटवण्यात यश आले. मृतदेहाच्या फॉरेन्सिक तपासणीतून अत्याचाराची भीषणता समोर आली.
फॉरेन्सिक अहवालात त्यांच्या शरीरावर ओरखडे, मोडलेली हाडे, गळ्यावर खोल जखमा आणि इलेक्ट्रिक शॉकच्या खुणा स्पष्टपणे दिसून आल्या. सर्वात हादरवणारी बाब म्हणजे, त्यांचा मेंदू, डोळे आणि श्वसननलिका शरीरातून गायब होत्या. अत्याचाराचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हे अवयव काढले असावेत, असा प्रबळ संशय व्यक्त होत आहे.
युक्रेनच्या सरकारी वकिलांनी याला युद्ध गुन्हा आणि पूर्वनियोजित हत्या ठरवले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि युरोपीय संघाने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशीची आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. रशियाकडून युद्धक्षेत्रातील सत्य दडपण्यासाठी पत्रकारांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही युक्रेनने केला आहे, सध्या खार्किव (Kharkiv) सारख्या शहरांवर रशियन हल्ले सुरूच आहेत.