‘महात्मा बसवेश्वर हे जगातील पहिल्या लोकशाहीचे उद्गाते!’ – डॉ. श्रीपाल सबनीस

0
8

पिंपरी, दि. ३० ‘महात्मा बसवेश्वर हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिल्या लोकशाहीचे उद्गाते होते!’ असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मंगळवार, दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी महात्मा बसवेश्वर पुतळा उद्यान, भक्ती – शक्ती चौक, निगडी येथे व्यक्त केले. वीरशैव लिंगायत समाज आणि पिंपरी – चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शब्दवैभव काव्यसंमेलनात डाॅ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील अध्यक्षस्थानी होते; तसेच नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, पिंपरी – चिंचवड साहित्य मंचाचे अध्यक्ष राजेंद्र घावटे, सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित, बसवेश्वर पुतळा समिती अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘बाराव्या शतकात बसवेश्वर यांनी लोकशाहीची मुळे रुजवली. कार्ल मार्क्स, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा अशा असंख्य प्रभृतींचे पूर्वज म्हणजे महात्मा बसवेश्वर होत. त्यामुळेच महात्मा गांधी, मानवेंद्र नाथ रॉय, राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अशा अनेक दिग्गजांनी बसवेश्वर यांच्याविषयी एकमुखाने गौरवोद्गार काढले आहेत. इंग्लंडमध्ये थेम्स नदीच्या काठावर बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यामुळे महात्मा बसवेश्वर यांना लिंगायत पंथापुरते मर्यादित ठेवता येणार नाही; तर वैश्विक महापुरुष म्हणूनच त्यांच्याकडे पाहवे लागेल; तसेच त्यांच्या लोकशाही तत्त्वानुसार साहित्य, संगीत, कला यांनाही वैश्विक परिमाण लाभेल!’

व्याख्यानापूर्वी, ज्येष्ठ कवी प्रा. तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शब्दवैभव काव्य संमेलन संपन्न झाले. यामध्ये राज अहेरराव, राजेंद्र घावटे, अनिल दीक्षित, शोभा जोशी, चंद्रकांत धस, पीतांबर लोहार, बाबू डिसोजा, रेणुका हजारे, सुनंदा शिंगनाथ, हेमंत जोशी, नीलेश शेंबेकर, सविता इंगळे, कैलास भैरट, पौर्णिमा कोल्हे, अरुण कांबळे, ज्योती देशमुख, दत्तू ठोकळे, वंदना इन्नाणी या निमंत्रित कवींनी सहभाग घेतला. गझल, लावणी, सवालजबाब, दोहे, मुक्तच्छंद अशा वैविध्यपूर्ण काव्यप्रकारांच्या आशयगर्भ कवितांना श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिल्याने कविसंमेलन उत्तरोत्तर रंगत गेले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. राजाराम सावंत यांनी आभार मानले.