मराठी साहित्य परंपरेत स्त्री साहित्याची मोठी कामगिरी-प्रा.तुकाराम पाटील

0
5

पिंपरी, दि. २८
‘मराठी मायबोलीच्या साहित्य परंपरेत स्त्री साहित्याची कामगिरी मोठी आहे. पारंपरिक लोकसाहित्यातही स्त्री साहित्य अग्रेसर आहे. संस्कारक्षम साहित्य निर्माण करून महाराष्ट्राची तरुणपिढी सुसंस्कारित, धाडशी आणि कर्तृत्ववान करण्यात स्त्रियांनीच मोलाची कामगिरी केली आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी स्त्रीशक्तीने सातत्याने प्रयत्न करायला हवेत. तोच प्रयत्न सीमा संतोष जाधव करीत आहेत!’ असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी मोशी येथे बोलताना काढले. सीमा संतोष जाधव यांच्या ‘काव्यसीमा’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून तुकाराम पाटील बोलत होते.
इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गझलकार राज अहेरराव, ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे, लोकसाहित्याचे अभ्यासक सोपान खुडे, इतिहास संशोधक ब. हि. चिंचवडे, विनायक गुहे, वंदना आल्हाट, राम सासवडे, गणेश सस्ते, संतोष जाधव इत्यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अहेरराव म्हणाले, ‘कविता लिहिण्यासाठी आत्मबळ आवश्यक आहे. साहित्य क्षेत्रात नवकवी किंवा ज्येष्ठकवी ही संकल्पना चुकीची वाटते. वास्तविक कुठलाही कवी काव्य निर्माण करत नसतो, तर एक अज्ञात शक्ती त्यास काव्यप्रेरणा देत असते. जो काव्य रचतो तो व्यास, जो काव्य ऐकतो तो अर्जुन, जो काव्याचा भावार्थ विषद करतो तो ज्ञानेश्वर, जो काव्याची उकल करून समाजाला अर्पण करतो तो तुकाराम, जो काव्य जगतो तो भक्त पुंडलिक आणि जे काव्यावर प्रेम करतात ते वारकरी जे इथे आलेले सर्व रसिक आहेत.’ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे यांनी, ‘सीमा जाधव यांच्या काव्यप्रतिभेतून बहिणाबाई चौधरी डोकावत असल्याचे सांगितले. वाचनाने, सरावाने कविता प्रगल्भ होते. साहित्यलेखन ही एक तपश्चर्या आहे. बोलत राहिले की पायाखालची वाट लवकर संपते; परंतु लिहित राहिले की वाटसुद्धा बोलू लागते. सीमा जाधव यांच्या कविता अतिशय आशयसंपन्न आहेत.’ असे मत मांडले. याप्रसंगी सोपान खुडे, ब. हि. चिंचवडे, सीमा जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. सोनाली चिंतामणी, प्रा. जयश्री थोरवे, तेजस्विनी जाधव, रसिका सस्ते इत्यादी कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले. मनोज तांबे यांनी सूत्रसंचालन केले. रूपाली काळे, शीतल सस्ते, सुनील जाधव, इत्यादींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.