– दिव्यांग बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पिंपरीत राष्ट्रीय परिसंवाद
पिंपरी, दि . २८ ‘दिव्यांग भवन अशी संकल्पना राबवणारी पिंपरी चिंचवड देशातील पहिली महानगरपालिका आहे. प्रत्येक राज्यातील महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेट देऊन असे उपक्रम राबवायला हवेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दिव्यांग भवन म्हणजे देशातील पहिल्या दिव्यांग सक्षमीकरणाचे आदर्श मॉडेल आहे,’ असे प्रतिपादन भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशन तर्फे २८ एप्रिल २०२५ रोजी ग. दि. माडगुळकर नाट्यगृह, आकुर्डी येथे राष्ट्रीय परिसंवाद संपन्न झाला. यावेळी अग्रवाल बोलत होते. ते दुरदृश्यप्रणालीद्वारे परिसंवादात सहभागी झाले होते.
या परिसंवादाला डॉ. शरणजीत कौर (भारत पुनर्वसन परिषद), पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे,दिव्यांग कक्षाच्या सहाय्यक आयुक्त निवेदिता घार्गे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे,प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, बालवाडी/अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक/ समन्वय तसेच सामाजिक संघटनांचे कर्मचारी उपस्थित होते.
परिसंवादात मार्गदर्शन करताना डॉ. शरणजीत कौर म्हणाल्या की, ‘मी माझ्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत दिव्यांग भवनसारखा उपक्रम यापूर्वी कधीच पाहिला नाही. देशातील सर्व महानगरपालिकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपक्रमांची दखल घेत असे उपक्रम राबवावेत,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, ‘दिव्यांग मुलांची नोंद घेण्यासाठी लवकरच ‘शून्य ते सहा’ ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यामध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाईल, ज्यातून शहरात किमान एक लाख दिव्यांगांची नोंद होईल. अंगणवाडी सेविकांचा या उपक्रमात मोलाचा वाटा राहील.’
यावेळी सिंह यांनी ‘दिव्यांग भवन फाऊंडेशन’ आणि इतर संस्थांनी महानगरपालिकेसोबत केलेल्या कार्याची प्रशंसा केली आणि महानगरपालिकेचे दिव्यांग भवन देशभरासाठी एक आदर्श केंद्र बनवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
‘आपली महानगरपालिका केवळ नेतृत्व देणारी नाही, तर देशभरातील लोकांसाठी आदर्श केंद्रही बनू शकते,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते ‘उन्नती समावेशित शिक्षणाची, प्रथम या संस्थेचा शीघ्र हस्तक्षेपण व शालेय तयारीकरिता क्रॉस डिसेबिलिटी (दिव्यांगत्व) अभ्यासक्रम आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले.