पिंपरी,दि. २६ -‘जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो!’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालणारे स्वामी विज्ञानानंद’ या विषयावर तृतीय पुष्पाची गुंफण करताना वर्षा तोडमल बोलत होत्या. माजी महापौर अपर्णा डोके अध्यक्षस्थानी होत्या; तसेच गीतल गोलांडे, चंद्रकला शेडगे, प्रभा इंदलकर, मंदाकिनी चोपडे, कस्तुरी जमखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेमा सायकर यांनी प्रास्ताविकातून, ‘शिवबांना घडविणाऱ्या जिजाऊ या आजही समाजाला प्रेरक आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन महिलांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी गांधीपेठ तालीम मित्रमंडळ विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते!’ अशी माहिती दिली. अपर्णा डोके यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘गांधीपेठ तालीम मित्रमंडळ हे चिंचवडचे भूषण आहे!’ असे गौरवोद्गार काढले.
प्रा. डाॅ. वर्षा तोडमल पुढे म्हणाल्या की, ‘अध्यात्म आणि विज्ञान यांची सुयोग्य सांगड घालून स्वामी विज्ञानानंद यांनी लोणावळा येथे मनशक्ती प्रयोग केंद्र या संस्थेची स्थापना केली. पाच भाषांमधून सुमारे अडीचशे ग्रंथांचे लेखन त्यांनी केले. त्यांनी निर्माण केलेल्या ‘वंदे मातरम्’ या चित्रपटात पु. ल. आणि सुनीताबाई देशपांडे यांनी नायक – नायिकेच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘प्रकाश वेगाच्या पलीकडे जाते ते मन’ अशी मनाची व्याख्या करीत विज्ञानातील न्यूटन आणि अध्यात्मातील वेद यांचा समन्वय साधून विज्ञानानंद यांनी ‘न्यूवे’ या तत्त्वानुसार मनाच्या शक्तींवर विविध प्रयोग केले. आयुष्यात भावनांचे महत्त्व असलेतरी भावनांच्या आहारी जाऊन माणसाची बरीच शक्ती व्यर्थपणे खर्च होते. त्यामुळे योग्य कारणासाठी शक्ती शिल्लक राहत नाही. षड्विकार अन् भावभावनांचे सकारात्मक रूपांतर करता आले पाहिजे; अन्यथा मनातील ताणतणाव वाढीस लागतात. वास्तविक हे कळत असूनही वळत नाही म्हणून आपण आनंदाला पारखे होतो. हेतू, गती, परिणाम यांतून आयुष्य घडत असते म्हणूनच जगताना विवेक खूप महत्त्वाचा असतो. याचे भान ठेवणारे जगात वंदनीय ठरतात. यासाठी साधना आवश्यक असून साधनेशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. साधनेत सातत्य असले की आयुष्यात बदल घडतो. देशाच्या समृद्धी अन् संपन्नतेसाठीही ते गरजेचे आहे!’ असे विचार अतिशय ओघवत्या अन् लालित्यपूर्ण शैलीतून मांडताना तोडमल यांनी कविता, किस्से, विविध संदर्भ उद्धृत करीत विषयाची मांडणी केली. स्मिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. हेमा सायकर यांनी आभार मानले.