पालावरचा मेंढपाळ झाला आयपीएस अधिकारी

0
5

कोल्हापूर, दि. २४ : बिरदेव ढोणे या होतकरु तरुणाचा वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय त्यामुळे लहानपण शेळ्या-मेंढ्यांच्या पाठीमागे फिरूनचं गेलं. शाळेत मात्र पोरानं चुनूक दाखवली आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मुरगूड केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. अभ्यासात लहानपणापासूनच रुची असणारा बिरदेव बारावीत विज्ञान शाखेतही अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला. त्यानंतर पुण्यात स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केलं आणि अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून राजधानी दिल्ली गाठली. दोन प्रयत्नात अपयश आलं मात्र जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावचा बिरदेव ढोणेनं यूपीएससीचं मैदान मारलं आहे.

मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात ५५१वा रँक घेऊन पठ्ठ्याने आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. बिरदेवला भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्याचा मित्राचा फोन आला. तेव्हा तो बेळगावजवळील एका धनगरवाड्याजवळ मेंढरं चारत होता, ही वार्ता जेव्हा यमगे गावी पोहोचली तेव्हा गावचा धनगरवाडा मेंढपाळाच्या पोरांनं मिळविलेल्या लख्ख यशात उजळून निघाला आहे.

कागल तालुक्यातील यमगे येथील सिद्धाप्पा ढोणे हे वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय करतात. मुलांनी शिकून मोठ अधिकारी व्हावं, यासाठी ढोणे दांपत्याने मुलगा बिरदेव याला लहानपणापासूनच चांगलं शिक्षण मिळावं, यासाठी प्रयत्न केले. बिरदेव यांनीही आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत शैक्षणिक कारकीर्दीत घवघवीत यश मिळवलं होतं. पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण करून दिल्लीत बिरदेव गेली ४ वर्ष यूपीएससीची तयारी करत होता, दोन प्रयत्न करूनही बिरदेवला यश मिळालं नव्हतं मात्र त्याने अभ्यासात सातत्य ठेवत यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वा रँक मिळवत भारतीय पोलीस सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केलं आहे.