- शहराला सुरळीत व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना*
पिंपरी, दि . २२ : इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून शहरातील नागरिकांना दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र व निघोजे बंधाऱ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी शहराला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी तसेच संबधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराच्या काही भागात आंद्रा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरणातील पाणी इंद्रायणी नदीत सोडून निघोजे बंधाऱ्यातून दोन पंपाद्वारे उचलले जाते. त्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. तेथे प्रक्रिया झाल्यानंतर जलवाहिन्यांद्वारे पाणी शहराला वितरित केले जात आहे. मात्र, राजे संभाजीनगर, शाहूनगर, कुदळवाडी अशा भागात दूषित पाणी येत असल्याची तक्रार नुकतीच महानगरपालिकेला प्राप्त झाली होती. या तक्रारीची तातडीने दखल घेत महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी निघोजे बंधारा व चिखली जलशुद्धीकरण केंद्र येथे भेट देत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.
‘निघोजे बंधाऱ्यातील पाणी उपसा करण्यासाठी असणाऱ्या पंपाना आवश्यकतेनुसार ५ ते ६ एरेटर बसवण्यात यावेत. बंधाऱ्यातील जलपर्णी ही तातडीने काढण्यात यावी, अशा सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या. तसेच बंधाऱ्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना पाटबंधारे विभागाला दिली. चिखली जलशुद्धीकरण केंद्रामध्येही एरेटरची संख्या वाढवण्यात यावी. ज्या भागात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे, तेथील पाणी नमुन्यांची संख्या वाढवून त्याची तपासणी करा,’असेही आयुक्त सिंह यांनी सांगितले.
चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्र व निघोजे बंधाऱ्याला भेट दिल्यानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी दिलेल्या सूचनांनुसार तातडीने पाणी पुरवठा विभागाकडून काम सुरू करण्यात आले आहे. अशुद्ध पाण्याबाबत नागरिकांच्या ज्या भागातून तक्रारी जास्त आहेत, त्या भागातील समस्या सुटावी, यासाठी तेथे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका