पाकिस्तान बॉर्डरच्या आस-पास मिलिट्री तैनात

0
6

दि . २३ ( पीसीबी ) – जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला अजून भारताने उत्तर दिलेलं नाही. पण हे उत्तर देण्याआधीच पाकिस्तान दहशतीच्या सावटाखाली आहे. पाकिस्तानने बॉर्डरच्या आस-पास मिलिट्री तैनाती वाढवली आहे. सोशल मीडियावरुन हे दावे केले जात आहेत. पाकिस्तानकडून फायटर जेट्सची तैनाती केली जात आहे. पाकिस्तानने अजून यावर पुष्टी केलेली नाही. सोशल मीडियावर फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार 24 चे अनेक स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. यात पाकिस्तान एअरफोर्सची (PAF) विमानं कराची येथील दक्षिणी बेसवरुन लाहोर आणि रावळपिंडीच्या उत्तरेला असलेल्या एअरबेसच्या दिशेने उड्डाण करत आहेत. रावळपिंडीमध्ये PAF चा नूर खान बेस आहे. पाकिस्तानचा हा प्रमुख ऑपरेशनल बेस आहे.

दुसऱ्या व्हायरल पोस्टमध्ये PAF101, एक छोटं एम्ब्रेयर फेनोम 100 जेट उड्डाण करताना दिसतय. VIP ट्रान्सपोर्ट किंवा सिक्रेट ऑपरेशन्ससाठी या विमानांचा वापर केला जातो. पाकिस्तान या सगळ्या हालचालींवर मौन बाळगून आहे. जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाममध्ये झालेला हल्ला हा ISI ने भारतासोबत मर्यादीत संघर्ष सुरु करण्याच्या इराद्याने केलाय असे दावे सोशल मीडियावर केले जात आहेत. भारताला डिवचून पाकिस्तानात काही जणांनी आपली राजकीय पोळी भाजण्याची तयारी चालवली आहे.

2019 साली पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने थेट बालकोटमध्ये एअर स्ट्राइक करुन या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं होतं. 1971 नंतर पहिल्यांदाच त्यावेळी भारतीय फायटर जेट्स पाकिस्तानात घुसली होती. एक दहशतवादी प्रशिक्षण तळ भारतीय जेट्सनी उद्धवस्त केला होता. आताही भारताकडून अशाच प्रकारची कारवाई होईल अशी भिती पाकिस्तानला आहे.

अर्थव्यवस्थेवर आघात करण्याचा डाव

आता जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाम येथे हल्ला झाला आहे. काश्मीर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. भारतावर झालेला हा सर्वात मोठा वार आहे. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर आघात करण्याचा डाव यामागे आहे. या कटामागे जे आहेत, त्यांना सोडणार नाही, हे भारताने आधीच स्पष्ट केलय. भारताने याआधी दोनवेळा पाकिस्तानात घुसून कारवाई केली आहे.