दि . २३ ( पीसीबी ) – जम्मू -काश्मीरमधील पहलगाम येथे काल दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांचाही समावेश आहे. त्यामध्ये पु्ण्याचे 2, डोंबिवलीतील 3 तर नवी मुंबईतील एकाचा समावेश आहे. या हल्ल्यामध्ये अनेक भारतीय तसेच विदेशी पर्यटकही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवलीतील हेमंत जोशी, संजय लेले और अतुल मोने या तिघांचा तर पुण्यातील संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे आणि नवी मुंबईतील दिलीप देसले अशी मृतांची नावे आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पनवेलचे रहिवासी दिलीप देसले यांनाही आपला जीव गमवावा लागला. भाजप आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीरमधील दुःखद आणि भयानक हल्ल्याचा तीव्र निषेध केला पाहिजे. या गोळीबारात नवीन पनवेल येथील रहिवासी दिलीप देसले यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर ओडिशातील बालासोर येथील रहिवासी प्रशांत सत्पथी यांनाही या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला. त्यांचे मोठो भाऊ सुशांत सत्पथी यांना बोलताना अश्रू अनावर झाले होते. ‘आम्हाला दुपारी ३ च्या सुमारास माहिती मिळाली. जेव्हा आम्ही टोल-फ्री नंबरवर फोन केला तेव्हा त्यांनी आमच्या धाकट्या भावाच्या मृत्यूची बातमी आम्हाला दिली. माझ्या धाकट्या भावाची पत्नी किंवा माझ्या पुतण्याबद्दल मला कोणतीही माहिती नाही, ते कुठे आहेत, हे काहीच कळलेलं नाही. अतिरिक्त डीएसपीने माझ्याशी संपर्क साधलाय, असं त्यांनी सांगितलं.
गुजरातच्या नागरिकाचाही मृत्यू
दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात गुजरातमधील एका व्यक्तीलाही आपला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश भाई हिम्मत भाई कडतिया (वय 44) असे त्यांचे नाव आहे. घटनेच्या वेळी त्यांची पत्नी आणि दोन मुले, एक मुलगा आणि एक मुलगी, देखील त्यांच्यासोबत होते. शैलेश यांचे निधने झाले, मात्र त्यांचे कुटुंबीय सर्व सुरक्षित आहेत आणि त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. सुरत जिल्हा आपत्कालीन ऑपरेशन सेंटरचे उप तहसीलदार साजिद यांनी ही माहिती दिली.
फेब्रुवारीत झालं लग्न, कानपूरचा शुभम काश्मीरला फिरायला गेला पण..
तर उत्तर प्रदेशातील कानपूर येथे राहणाऱ्या शुभम द्विवेदीचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्याचा चुलत भाऊ सौरभ द्विवेदीने त्याच्याबद्दल माहिती दिली.’ 12 फेब्रुवारीला शुभम भैयाचं लग्न झालं होतं. ते पत्नीसोबत पहलगामला फिरायला गेले होते. शुभम भैयाच्या डोक्यात गोळी लागल्याचं माझ्या वहिवीने काकांना फोन करून सांगितलं. नाव विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, असं बोललं जातं’ असं सौरभ द्विवेदीने सांगितलं.