मुस्लिम आहेस का… मग, कलमा वाच

0
7

दि . २३ ( पीसीबी ) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कानपूर इथला व्यापारी शुभम द्विवेदी (31 वर्षे) याचाही समावेश होता. पत्नी आणि 11 सदस्यांच्या फॅमिली ग्रुपसोबत तो काश्मीरला फिरायला गेला होता. शुभमचं लग्न दोन महिन्यांपूर्वी 12 फेब्रुवारी रोजी एशान्या द्विवेदीशी झालं होतं. लग्नानंतर शुभम आणि एशान्याची ही दुसरी ट्रिप होती आणि यावेळी त्यांनी कुटुंबीयांसोबत फिरण्याचं ठरवलं होतं. शुभम आणि एशान्याचे कुटुंबीयसुद्धा या ट्रिपमध्ये सहभागी होते. दहशतवाद्यांनी शुभमला कुराणमधील कलमा बोलून दाखवण्यास सांगितलं. शुभमला ते म्हणता न आल्याने अतिरेक्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

“शुभम आणि एशान्या हे घोडेस्वारी करत परिसरात फिरत होते, तेव्हाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. सैन्याच्या वेशात असलेल्या एका अतिरेक्याने शुभमला विचारलं की, तू मुस्लीम आहे का? तर दुसऱ्याने त्याला कलमा म्हटल्यास सांगितलं. त्यावर शुभमने कलमा येत नसल्याचं सांगताच त्याला गोळी झाडली”, अशी माहिती शुभमचा चुलत भाऊ सौरभने दिली. “शुभमची पत्नी एशान्या अतिरेक्यांना म्हणाली की, मलासुद्धा मारून टाका. पण त्यांनी नकार दिला आणि म्हणाले जाऊन तुझ्या सरकारला सांग की आम्ही काय केलंय”, असं सौरभने सांगितलं.

काश्मीरमधील हा गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला होता. यावेळी दहशतवाद्यांनी पहिल्यांदाच पर्यटकांना लक्ष्य केलं. पहलगाममधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. बैसरन खोऱ्यात टेकडीवरून खाली उतरून दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. 40 पर्यटकांना घेरून त्यांना लक्ष्य केलं. तिथं जाण्यासाठी अरुंद वाट असल्याने पर्यटकांना आडोशाला जाण्याची संधी मिळाली नाही. रक्ताच्या थारोळ्यात पर्यटकांचे कुटुंबीय मदतीसाठी धावा करत होते. काही स्थानिकांनी पाठीवरून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या हल्ल्यात किमान 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये डोंबिवलीचे तिघे तर पनवेलमधील एकाचा समावेश आहे.