नाशिक : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात देशासह जगभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी या ठिकाणी कायमच रांगा लागलेल्या असतात. अशा या त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधुची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात साधुवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराच्या मारहाणीनंतर 52 वर्षीय साधुचा जागीच मृत्यू झाला.
त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या झालेल्या हत्येप्रकरणी वातावरण तापल असून आखाड्याचे महंत आक्रमक झाले आहेत. तसेच याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने महंत संतप्त झाले आहेत. आखाडा परिषदेने पोलिसांकडे मारहाणीचे सीसीटीव्ही पुरावे सादर केले. नशेखोरांच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाल्याचा त्र्यंबकेश्वरमधील आखाड्यातील महंतांचा आरोप आहे. या घटनेनंतर आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीतील दारु दुकाने बंद करण्याची मागणी साधू महंतांकडून केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीच त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर आता घडलेल्या हत्येच्या घटनेने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.











































