- एकाच चित्तेवर दोघांवर अंत्यसंस्कार
दि . २१ ( पीसीबी ) बुलढाणा : लग्नात सात जन्माची सोबत निभावण्याची शपथ घेणाऱ्या एका दाम्पत्याच्या आयुष्याचा शेवटही सोबतच झाला. पतीचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर दुःख सोसले न गेल्याने पत्नीचेदेखील काही वेळातच निधन झाले. दोघांच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील डोढ्रा येथे ही हृदयद्रावक घटना घडली.
मोतीसिंग परिहार (वय 75) यांना शनिवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास हृदयविकाराचा धक्का बसला. पतीच्या निधनाची बातमी ऐकताच पत्नी अन्नपूर्णा परिहार (65) यांच्यावर मनावर मोठा आघात झाला. दु:खावेग असह्य झाल्याने त्यांनीही दुपारी जगाचा निरोप घेतला.
एकाच दिवसात काही तासांच्या फरकाने पती-पत्नीचे निधन झाल्याने परिहार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मोतीसिंग आणि अन्नपूर्णा यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ दिली. एकाच चितेवर त्यांना भडाग्नी देण्यात आला. अंत्यसंस्काराच्या वेळी गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
20 एप्रिल रोजी सकाळी चार वाजता मोतीसिंग परिहार (वय वर्ष 75) यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबीयांनी तातडीने वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. पतीच्या निधनाची बातमी पत्नी अन्नपूर्णा यांना सहन झाली नाही. दुपारच्या सुमारास त्यांनीही अखेरचा श्वास घेतला.
मोतीसिंग परिहार आणि अन्नपूर्णा परिहार हे डोढ्रा गावातील प्रेमळ जोडपे म्हणून ओळखले जात होते. दोघांनी आपले संपूर्ण आयुष्य एकमेकांच्या साथीने व्यतीत केले. त्यामुळे त्यांच्या निधनाने केवळ परिहार कुटुंब नाही, तर संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. दोघांच्या अंत्ययात्रेला गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सायंकाळी मोतीसिंग आणि अन्नपूर्णा यांच्यावर एकाच चितेवर संस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मन गहिवरले होते.
परिहार दाम्पत्याच्या पश्चात त्यांचा मुलगा चरणसिंग मोतीसिंग परिहार आणि मुलगी शालुबाई विनोद (राहणार वाघापूर) असा परिवार आहे. अन्नपूर्णा परिहार यांचे माहेर बेराळा येथील होते. या दुःखद घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा पहाड कोसळला आहे. यातून परिहार कुटुंब आणि नातेवाईकांना सावरण्यासाठी गावकऱ्यांनी आणि मित्र परिवाराने निधी आणि आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.
मोतीसिंग परिहार हे केवळ एका कुटुंबाचे आधार नव्हते, तर ते राजकीय, सामाजिक आणि सांप्रदायिक क्षेत्रातील एक वटवृक्षाप्रमाणे होते. त्यांच्या सावलीत अनेक जणांनी आश्रय घेतला. त्यांच्या जाण्याने परिहार कुटुंबच नाही, तर संपूर्ण गावाचा एक मार्गदर्शक हिरावला आहे. राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने आणि लोकांप्रती असलेल्या निष्ठेने एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी नेहमी सामान्यांच्या हक्कासाठी संघर्ष केला आणि विकास कामांना नवी दिशा दिली. त्यांचा स्पष्ट विचार आणि धडाडीचे निर्णय आजही कार्यकर्त्यांना प्रेरणा देत राहतात.