अभिनेत्याची पत्नीच जेवणातून द्यायची स्लो पॉयझन

0
9

फिल्म इंडस्ट्री जेवढी ग्लॅमरस दिसते, तेवढीच ते एक मायाजाल असल्याचं आपण अनेकांकडून ऐकतो. एवढंच काय तर, सिनेसृष्टीची काळी बाजू दर्शवणारी अनेक उदाहरणंही आपण पाहिली आहेत. याच ग्लॅमरस दुनियेत आपलं नाव कमावणासाठी धडपडणाऱ्या अभिनेत्याच्या वाट्याला आयुष्यभराचं दुःख आलं आहे. अभिनेत्याच्या बायकोनं त्याच्यासोबत असं काही केलं की, तो त्या धक्क्यातून कदाचितच सावरेल.

‘एफआयआर’ आणि ‘मे आय कम इन मॅडम’ यांसारख्या शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि सर्वांना खळखळून हसवणारा अभिनेता संदीप आनंदला त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक खचता खाव्या लागल्या आहेत. त्याला आयुष्यात पावला पावलावर धोका आणि दुःख मिळालंय. त्याच्या वैवाहिक आयुष्यात जे काही घडलं, हे जाणून तुम्हीही हादरुन जाल. त्याला त्याच्या स्वतःच्या पत्नीनंच उद्ध्वस्त केलं. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे, संदीपचा बालपणीचा अत्यंत जीवलग मित्रही पत्नीसोबत कटात सहभागी होता.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संदीप आनंदनं अरेंज-मॅरेज केलेलं, त्याला एक मुलगाही आहे. पण, पत्नी त्याच्यासोबत विषप्रयोग करुन मुलाला घेऊन पळून गेली. आजही संदीप पोटच्या मुलाला भेटण्यासाठी आसूसला आहे.

अभिनेता संदीप आनंदनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, त्यांचं लग्न जास्त काळ टिकलं नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. अभिनेत्यानं या लग्नाला विश्वासघात म्हणून संबोधलं. लग्नापूर्वी तो त्या मुलीला फक्त 2-3 वेळाच भेटलेला, असं अभिनेत्यानं सांगितलं. लग्नानंतर तो मुंबईत आला, त्यावेळी करिअरच्या नादात त्याला घरात जास्त वेळ देता येत नव्हता. याचाच गैरफायदा त्याच्या पत्नीनं घेतला आणि त्याला विषाचा घोट पाजला.

संदीप ‘मे आय कम इन मॅडम’ मध्ये काम करत असतानाच, त्याची प्रकृती हळूहळू बिघडायला सुरुवात झालेली. त्याच्या प्रकृतीत विचित्र बदल झाले, त्याचं वजन अचानक वाढायला लागलं होतं. शरीर थकू लागलं होतं, आणि मानसिकदृष्ट्याही तो कोलमडत चालला होता. त्याच्या जेवणात स्लो पॉयझन मिसळलं जात होतं, याचा उलगडा अभिनेत्याला बऱ्याच दिवसांनी झाला.

घटस्फोटानंतर दोन वर्षांनी, अभिनेत्याला कळलं की, त्याचा बालपणीचा मित्र देखील त्याच्या पत्नीसोबतच्या कटात सामील होता. सध्या त्याचा बालपणीचा मित्र, अभिनेत्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि मुलासह गायब आहे. धक्कादायक म्हणजे, संदीपचा दावा आहे की, त्याचा मित्र त्याच्या पत्नीशी जवळीक वाढवून त्याला संपवण्याचा डाव आखत होता. दरम्यान, घटस्फोटाच्या वेळी, अभिनेत्यानं त्याची सर्व मालमत्ता त्याच्या पत्नीला पोटगी म्हणून दिली होती आणि स्वतः आश्रमात दिवस घालवू लागला.