– खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी
पिंपरी – मावळ लोेकसभा मतदारसंघात असलेल्या लोहगड किल्यावरील कामाची खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी पाहणी केली. किल्ल्यावरील बुरुजाची डागडुजी, पायऱ्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. लोहगडाचा जागतिक वारसा स्थळात लवकरच समावेश होणार असल्याची माहितीही खासदार बारणे यांनी दिली.
खासदार बारणे यांनी गुरुवारी लोहगड किल्याला भेट दिली. पूर्ण गडावर फिरुन पाहणी केली. गडावर चाललेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी पुरातत्व विभागाचे पुणे विभागाचे अधिकारी गजानन मांढवरे, शिवप्रेमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन टेकाळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरदराव हुलावळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, माजी सभापती गणेश धानीवले, अलका धानीवले, उपतालुका प्रमुख राम सावंत, चंद्रकांत बोते, अमित कुंभार, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल हुलावळे, सरपंच सोनाली बैवरे, उपसरपंच पंढरीनाथ विखार, सुनील हगवणे, मुन्ना मोरे, दत्ता केदारी, कमलेश शेळके, सचिन भोरडे, नितीन देशमुख, राजू गुजरआदी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, लोहगड किल्याच्या पायथ्याशी शिवस्मारकाचे काम अर्धवट आहे. शिवस्मारकाचे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. किल्ले संवर्धन, सुशोभीकरण करण्याबाबत केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि राज्याचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेणार आहे. लोहगड किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार या किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात लवकरच समावेश होणार आहे.
किल्ल्यावरील बुरुजाची डागडुजी, पायऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारने अडीच कोटी रुपयांचा निधी दिला होता. या निधीतून पुरातत्व विभागाने मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. किल्ल्यावरील बुरुजाची डागडुजी, पायऱ्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहे. लोहगडासह मावळात विसापूर, तुंग, तिकोना, राजमाची किल्ले आहेत. जवळच लोणावळा, भाजे लेणी आहे. त्यामुळे किल्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटन वाढीबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला माहिती व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गड किल्ल्यांवर येणारे शिवप्रेमी, शिवभक्त, पर्यटकांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.











































