कुणी सिंचन पचवून दिलीय ढेकर , तर कुणी पचवलीय चक्कीसारेच साले निर्दोष स्वच्छ आहेत, बाबानो जनताच मूर्ख हे नक्की…

0
26
  • डॉ. श्रीकृष्ण जोशींच्या कविता तुफान व्हायरल

निगडी, दि. १७ (पीसीबी) – गलिच्छ राजकारण, भरकटलेले समाजकारण, अर्थकारणावर अगदी स्पष्ट शब्दांत भाष्य करणारी निगडी येथील जेष्ठ शल्यचिकित्सक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांची कविता सद्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. प्रख्यात स्टँडएप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विनोदी काव्याने शिंदे शिवसेना संतापली होती मात्र, त्याहीपेक्षा जबरदस्त उपहासात्मक काव्य डॉ. जोशी यांनी केले आहे. जसे आहे तसे आमच्या वाचकांसाठी तेच काव्य देत आहोत.

रिक्षावाला मुख्यमंत्री होताच
सामन्याची वाढली होती उंची
चहावाला पंतप्रधान आहे म्हणून
छाती झाली होती छप्पन इंची

घोषणा ऐकून भारावालो होतो
ना खाऊगा ना खाणे दुंगा
वाटल होत आता भ्रष्ट गुंडांचा
पलतून जाईल टांगा…..

हे मायबाप सरकार तेंव्हापासून
खरच आपल वाटत होत…
पण खंत वाटते मित्रहो
करोडोंची खंडणी वसूलीसाठी
गंला गोठून सुद्धा ते प्रकरण पुढे
पुढे कुणीतरी रेटत होत ….

वाळू नेणार, राख खाणार
अरे काय काय गिळणार होता पोटी
किती लुटणार देशाला सांगा
गरिबांच्या घामाचे कोटयानू कोटी …..

दिवसभर घाम गाळूनही
आमचे आई बाप झोपणार उपाशी पोटी
अन झिजवणार उंबरे सावकाराचे
काढलेल कर्ज भागवण्यासाठी ….

त्यानं पाह्यत रहायचं नुसत
कोरडया ढेकळाच रान
लालू सारखे खाणार गोठ्यातल ओरबाडून
चाऱ्यासहित हिरव पान ….

अरे असे किती किती भरले आहेत
संसदेच्या अंगणात लालू
कुणाला म्हणायचं आपण सज्जन
नि सांगा कुणाला म्हणायचं चालू …

कुणी सिंचन पचवून दिलीय ढेकर
तर कुणी पचवलीय चक्की
सारेच साले निर्दोष स्वच्छ आहेत
बाबानो जनताच मूर्ख हे नक्की…

तुम्ही मारा बी बियाणासाठी निर्लजनो
तहसीलात फेऱ्यावर फेऱ्या
याना पूर येवो की पिक जळून जावो
हे करतील पिक विम्यातही चोऱ्या ….

यांनी कधीच विकुन टाकलय
काळीज काळ्या मातीच
यांनी पेरलाय फक्त माणसात
बीज विषारी जातीच

ते दीक्षाभूमीत
जय भीम म्हणून
निळा फेटा बांधतील …

तेच शिवबाचा मराठी वारसा
रायगडावर जाऊन सांगतील

ते उधळतील भंडारा
घेऊन घोंगडी नि काठी

ते काहीही सोंग आणतील मर्दानो
खुर्ची टिकवण्यासाठी….

आपण भरायचा टॅक्स
आपल्याच पैशांनी खायला प्यायला
आपणच भरायचा टोल सरकारी रस्त्यावर
आपल्याच गाडीने जायला

करोडोंचे घोटाळे करून
याना फुकट कुठेही एंट्री
अभिमान आहे जगात या देशाचा
अशी भारत माझी कंट्री

किती खपायचं रानात किती राबायच उन्हात
तरी सुद्धा नाही नशिबात घोटभर चहा ….
हे सांगतील ट्रिलियन इकॉनॉमीचे स्वप्न
अच्छे दिन येतील पहा ….

यांनी गायची गाणी प्रगतीची
यांची मेट्रो सुसाट पळते
कोण सांगणार याना कथा जनरल डब्याची
तिथ उभा राहायलातरी कुठ जागा मिळते ……

चप्पल कुठली अनवाणी चालून
रक्तबंबाळ झालीय माझ्या बापाची टाच
आपल्याच सातबाऱ्यावर आपलच
नाव टाकायला भडवे मागतात खुशाल लाच…

तक्रार कुठ करायची कोण उरलाय पोलीस रक्षक
नेते, शिक्षक, डॉक्टर सोडा आसारामही झालेत भक्षक ….

आपण शिकायचं कर्ज काढून
आपल्या बापाच्या पायाला हजार भेगा
यांनी मागायच तोंडाला येईल ते
भरण्यासाठी सरकारी नोकरजागा…..

अहो,न्यायाधीशाच्या घरातच नोटाचा ढीग
आता कुणाकड मागायचा न्याय ?
गरिबांच्या हाती फुटका लोटा
नि कसायच्या हाती गेलीय गाय…..

मातीशी नाळ ज्याची ,तो गेलाय मातीत गाडला
खरच सांगतो यांनी फक्त
माती नाही दोस्तहो तर माझा देशच विकायला काढला……

षंढ झालाय तरुण, थंड झालय रक्त
विरोधी पक्षच झालाय सत्ताधाऱ्याचा भक्त
उठ मर्दा , मराठी मावळा,
ठेव जरा या मातीची आच….
नाठाळच्या छातीवरती पाय रगडून नाच…..

डॉ. श्रीकृष्ण जोशी, निगडी