रहाटणी येथील आनंद बुद्ध विहारात ग्रंथालयाचे लोकार्पण
रहाटणी, दि.१५ – स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र बुद्धिमत्तेतून साकारलेल्या संविधानात त्यांनी लोकशाही आणि प्रजासत्ताक कारभाराचा पुरस्कार केला. लोकशाहीत प्रत्येकाला समान हक्क तर प्रजासत्ताकमध्ये जनता हीच मालक अशी विचारधारा त्यांनी देशाला दिली. त्यांच्या याच सार्वभौम संविधानामुळे आज माझ्यासारख्या एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आमदार होण्याची संधी मिळाली अशा शब्दांत, आमदार शंकर जगताप यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त रहाटणी येथील आनंद बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आलेला जयंती उत्सवानिमित्त विहाराच्या वतीने साकारण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन आमदार शंकर जगताप हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, मा. नगरसेविका सविता खुळे, नरेश खुळे, प्राध्यापक डॉ. प्रकाश चौधरी आनंद मित्र मंडळाचे अध्यक्ष महादेव कांबळे, सचिव पोपट कदम, खजिनदार शशिकांत शेलार, महिलाध्यक्ष अनिता साळवे, अंजना कांबळे, शांता कांबळे, एकनाथ मंजाळ, राहुल भोसले, सखाराम कांबळे, रामा मुळे, प्रकाश सूर्यवंशी, निलेश मुळे, बनशी शिंदे, महेंद्र गायकवाड, सखाराम कांबळे, रमेश कांबळे, अनिता कांबळे, पंढरीनाथ सूर्यवंशी, डॉ. भीमराव सरवदे, प्राध्यापक उगले सर, अभियंता विजय कांबळे, रवी कांबळे, प्रा. प्रभाकर दाभाडे, रुपाली लोखंडे तसेच आनंद मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार जगताप यांनी स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप आणि आनंद बुद्ध विहार यांच्यातील ऋणानुबंधविषयी आठवणी सांगितल्या. ते म्हणाले की, लक्ष्मणभाऊंचे आनंद बुद्ध विहाराशी असलेले ऋणानुबंध जोपासण्याचा आणि पुढील काळातही जास्तीत जास्त वृद्धिंगत करण्याचा मी प्रयत्न करेन.
दरम्यान, आमदार जगताप यांनी आनंद बुद्ध विहारात उदघाटन करण्यात आलेल्या ग्रंथालयाच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच त्यांच्या वतीने ५०० पुस्तकांचा संच या ग्रंथालयाला भेट देण्यात आला.