पुण्यातील कोथरूड परिसरातील ५५ वर्षीय उद्योगपती लक्ष्मण शिंदे यांचा बिहारमधील जहानाबाद येथे गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना केवळ गुन्हा नसून सायबर मर्डर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एका बनावट व्यावसायिक ईमेलच्या माध्यमातून शिंदे यांना फसवून पाटण्याला बोलावण्यात आलं होतं.
शिंदे यांना एका बनावट मेलच्या माध्यमातून “कंपनीची टूल्स व मशिनरी स्वस्तात मिळेल” असं सांगण्यात आलं. व्यवसायाच्या व्यवहाराच्या उद्देशाने शिंदे बिहारला गेले. मात्र, काही वेळाने कुटुंबीयांचा त्यांच्याशी संपर्क तुटला. यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
११ एप्रिल रोजी संध्याकाळी शिंदे यांचे त्यांच्या पत्नी रत्नप्रभा यांच्याशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. अखेर, पाटणा परिसरात मृतदेह सापडल्यावर ही हत्या असल्याची पुष्टी झाली.
Pune Businessman Murder l तिघांपैकी एक महिला आरोपी; स्कॉर्पिओ, मोबाईल, लॅपटॉप जप्त :
या प्रकरणात पोलिसांनी एक महिला आणि तिघांना अटक केली आहे. स्क्रॅप डीलच्या नावाखाली शिंदे यांचं अपहरण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपींकडून एक काळी स्कॉर्पिओ, एक लॅपटॉप आणि चार महागडे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांच्या मते, ही सराईत गुन्हेगारांची टोळी असून याआधी अनेक अपहरणप्रकरणात ती सहभागी होती.
शिंदे यांचे मेहुणे विशाल लोखंडे यांनी पुणे व पाटणामध्ये तक्रार दाखल केली होती. तपासात पोलिसांना अशा टोळ्यांचा पूर्वीचा पॅटर्न मिळाला आहे, जिथे फसवून अपहरण केलं जातं आणि बँक खात्यांमधून पैसे काढून सोडून दिलं जातं. मात्र या प्रकरणात थेट हत्या झाली, ही बाब चिंतेची आहे.
सध्या पाटणा व जहानाबाद पोलीस याचा संयुक्त तपास करत आहेत. लक्ष्मण शिंदे यांना खरोखर का ठार मारलं गेलं, यामागे फक्त पैसे होते की आणखी काही, हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.