नवी दिल्ली, दि. १५ : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. तशा आशयाचा एक ई मेल अयोध्या राम मंदिर ट्रस्ट आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांच्या डीएमना आला आहे. सोमवारी रात्री हा धमकीचा ई मेल आला होता. या प्रकरणी अयोध्येच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा ई मेल तामिळनाडूतून आल्याची माहिती आहे.
सोमवारी रात्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या मेलवर धमकीचा मेल आला होता. ‘मंदिराची सुरक्षा वाढवा’ असं त्यामध्ये लिहिण्यात आलं होतं. धमकीचा मेल मिळाल्यानंतर व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली. राम मंदिर ट्रस्टने एफआयआर दाखल केला आहे.
अयोध्येसोबतच बाराबंकी आणि चंदौलीसह इतर अनेक जिल्ह्यांनाही धमकीचे मेल आले आहेत. बाराबंकी आणि चंदौलीच्या डीएमला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. अयोध्या आणि इतर जिल्ह्यांना पाठवलेला धमकीचा मेल हा तामिळनाडूतून आला असल्याची माहिती आहे. एफआयआर दाखल केल्यानंतर सायबर सेल पाठवलेल्या ईमेलची चौकशी करत आहे मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. या प्रकरणी गुप्तचर यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे.
राम मंदिराच्या सुरक्षेसाठी आधीच तैनात असलेल्या CRPF आणि UPSSF च्या तुकड्या आणखी मजबूत करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून मंदिर परिसरावर नजर ठेवली जात आहे. प्रवेश करणाऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. गुप्तचर यंत्रणाही संभाव्य धोक्याची चौकशी करत आहेत. प्रशासनाने भाविकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन केले आहे. अयोध्येतील राम मंदिराला धमक्या येण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेबर 2024 मध्ये एका तरुणाने सोशल मीडियावर धमकी दिली होती. त्यानंतर त्याला बिहारच्या भागलपूरमधून अटक करण्यात आली होती. जानेवारी 2024 मध्ये प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वीच अनेक धमक्या आल्या होत्या. या घटनांमुळे प्रशासन नेहमीत सतर्क असते. यावेळीही सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.