पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील संघटनांनी घेतली आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांची भेट : जलसंपदा विभाग, महापालिका यांना सूचना
पिंपरी, दि. १५ : नदीसुधारच्या नावाखाली मुळा नदीपात्र अरुंद केले जात आहे. त्यास पिंपरी- चिंचवड शहरातील पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भात शहरातील संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नदीचे पात्र अरुंद होत आहे, पुराची परिस्थिती निर्माण होईल, याविषयी माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आणि जलसंपदा विभागाला तातडीने बैठक घेण्याची सूचना केली आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या सीमेवर असणाऱ्या मुळा नदीचे सुशोभीकरण सुरु आहे. सिमेंटीकरण सुरु आहे. त्यास पर्यावरणवादी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. नदीकाठचे काँक्रीटीकरण थांबवून पूर थांबवण्यासाठी आणि नद्या स्वच्छ करण्यासाठी नदी बचाव शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
शिष्टमंडळामध्ये विधान परिषद सदस्य अमित गोरखे, ज्येष्ठ पर्यावरणवादी धनंजय शेडबाळे, जलबिरादरीचे नरेंद्र चुघ, सामाजिक कार्यकर्ते बाबा भोईर, पिंपरी- चिंचवड सिटीजन फोरमचे तुषार शिंदे आदी उपस्थित होते.
आमदार अमित गोरखे म्हणाले, ‘पिंपरी- चिंचवड शहरातील पर्यावरणवादी संघटनांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्यांची नदीसुधारविषयी भूमिका काय? हे समजून घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि पर्यावरणवादी संघटना आणि मुख्यमंत्री अशी भेट घडून आणली. नदी सुधारमुळे ३८ टक्के नदीपात्र अरुंद होणार आहे, ही बाब शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली. तरीही महापालिका हा प्रकल्प रेटत आहे हे नमूद केले. नदी सुधारविषयी असणाऱ्या पर्यावरणवाद्यांच्या सूचनांचा अंतर्भाव कराव्यात. याबाबत तातडीची बैठक घ्यावी, याविषयीच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केले आहे.’
धनंजय शेडबाळे म्हणाले, ‘शहरातील ४६ विविध क्षेत्रातील संस्थांच्यावतीने मुळा नदीवर सुरू असलेल्या काँक्रीटीकरण थांबवा आणि फक्त मुळा नदी नव्हे तर पवना आणि इंद्रायणी नद्यासुद्धा उगम ते संगम स्वच्छ करावे, याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. त्यांनी ते स्वीकारून राज्याच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव विकास खारगे, जलसंपदा विभाग आणि पिंपरी चिंचवड आयुक्त यांच्याशी त्वरित मीटिंग घेऊन नदी काँक्रीटीकरण आणि पूर परिस्थिती समजावून घेऊन त्वरित कारवाईचे निर्देश दिले आहेत.’