कोलकाता, दि. १५ – पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद शहरात वक्फ कायद्यावरुन उफाळलेल्या हिंसाचाराने भीषण स्वरुप धारण केले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मुर्शिदाबादमधील परिस्थिती चिघळल्याने याठिकाणी सीमा सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आले आहे. याठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अफवा पसरुन हिंसाचाराचे लोण आणखी पसरु नये, यासाठी मुर्शिदाबादसह लगतच्या चार जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 150 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हिंदु कुटुंबांनी जीव वाचविण्यासाठी घर सोडून अक्षरशः पळ काढला आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, मुर्शिदाबादसह जंगीपुर, मालदा आणि बीरभूम परिसरातील काही भागात मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा खंडित राहील. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीवी आनंद बोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजभवनाकडून मुर्शिदाबाद व अन्य जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. यासंदर्भात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचीही चर्चा झाली आहे. मुर्शिदाबादने केंद्र सरकारने बीएसएफच्या 9 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. वेळ पडल्यास याठिकाणी CRPF आणि RAF तुकड्या तयार आहेत. याशिवाय, राज्य पोलीस दलही याठिकाणी उतरवण्यात आले आहे. केंद्रीय दलाकडून संकटात सापडलेल्या लोकांना मदत केली जात आहे, अशी माहिती राज्यपालांकडून देण्यात आली.
पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांच्या दाव्यानुसार, मुर्शिदाबादच्या सुती, समशेरगंज, जंगीपुर, धुलियान आणि फरक्का या भागातून हिंदू कुटुंबीयांवर पलायन करण्याची वेळ आली आहे. या हिंदू कुटुंबीयांनी शेजारच्या जिल्ह्यांमध्ये तात्पुरता आश्रय घेतला आहे. जे हिंदू लोक बाहेर जाऊ शकले नाहीत, त्यांना मुलभूत गोष्टी मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. या कुटुंबीयांची घरे लुटण्यात आली आहेत. त्यांच्या घरांची नासधुस झाली आहे. तसेच हिंदू कुटुंबीय पाण्यासाठी वापरत असलेल्या विहिरींमध्ये विष मिसळण्यात आले आहे. यापैकी काही हिंदू कुटुंबीयांना सीमा सुरक्षा दलाची मदत मिळाली आहे.
शुभेंदु अधिकारी यांनी बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर वारंवार अत्याचार केले जात आहेत. त्यांच्याकडे राहायला घर नाही. निवडणुकांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, ही आमची मागणी आहे. त्याशिवाय राज्यात निष्पक्ष पद्धतीने निवडणुका होणार नाही, असे शुभेंदु अधिकारी यांनी म्हटले.
मदत द्यायला सरकारचा नकार; भाजपचा आरोप
विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी म्हटले की, जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक हिंसाचाराची झळ बसलेल्या भागात जाऊन मदतीचे साहित्य वाटण्यासाठी परवानगी नाकारत आहेत. मी यासंदर्भात सरकारला मेल पाठवला आहे. पण आतापर्यंत सरकारकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. मी रामकृष्ण मिशन, भारत सेवाश्रम संघ आणि इस्कॉन यांच्यासारख्या संस्थांना अडचणीत सापडलेल्या लोकांना अन्नसामुग्री आणि पिण्याचे पाणी पुरवावे, असे आवाहन करत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी शुभेंदु अधिकारी यांनी केली.