बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस निरीक्षक रणजीत कासले यांनी एक खळबळजनक दावा करत सांगितले की, “मला वाल्मिक कराडच्या बोगस एन्काऊंटरसाठी ५० कोटींची ऑफर देण्यात आली होती.” हा दावा करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यामुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही थेट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रणजीत कासले यांचा आरोप फेटाळत, “हा माणूस विकृत आणि विचित्र वागणारा आहे” अशी टीका केली आहे.
रणजीत कासले यांनी आपल्या व्हिडीओत सांगितले की, “माझ्याकडे वाल्मिक कराडच्या (walmik karad) एन्काऊंटरसाठी 5, 10, आणि अगदी 50 कोटी रुपयांची एकरकमी ऑफर आली होती. मी सायबर विभागात होतो. त्यांना वाटत होतं की हा माणूस हे काम करू शकतो. पण मी स्पष्ट नकार दिला, कारण हे पाप माझ्याकडून होणार नाही.”
कासले यांच्या या दाव्यानंतर एकच चर्चा सुरु झाली – जर हे खरे असेल तर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कथित एन्काऊंटर डीलपैकी एक असू शकतो. मात्र, त्यांच्या या आरोपावर संशयाची सावलीही पडली आहे.
रणजीत कासले यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना अंजली दमानिया म्हणाल्या, “कासले मला अत्यंत विचित्र आणि विकृत वाटतो. तो पहिल्याच दिवशी मद्यधुंद अवस्थेत काहीही बरळत होता. त्याच्याकडे लक्ष देऊ नये.”
त्यांनी पुढे म्हटलं, “जर त्याला खरंच अशी ऑफर मिळाली असती, तर तो लगेच बोलला असता. एवढ्या दिवसांनी व्हिडीओ काढून लोकांच्या भावना भडकवणे हा प्रकारच संशयास्पद वाटतो.” तसेच, त्यांनी कासलेवर “प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न” असल्याचा आरोपही केला.
या वादानंतर आता बीड पोलीस प्रशासनाकडून अधिकृत चौकशी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. रणजीत कासले यांनी याआधीही काही गंभीर आरोप केले होते, पण यावेळी त्यांनी थेट “भयानक एन्काऊंटर डील” उघड केल्याने प्रकरण अधिक गडद झाले आहे.