हनुमान जयंतीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात 116 ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा !

0
34

– हिंदूंमधील शौर्य व सामर्थ्य वाढवण्यासाठीच गदापूजन !
– श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

पुणे, दि. १३ – अयोध्येत स्थापन झालेले श्रीराममंदिर ही एकप्रकारे रामराज्याची सुरुवात असून आता रामराज्य सर्वत्र स्थापन व्हावे आणि हिंदू समाजातील शौर्य जागृत होण्यासाठी आज श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्या सहभागाने देशभरात 500 ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. पुणे जिल्ह्यात मंचर, वडगाव काशिंबे, पिंपळगाव खडकी, भुकूम खाटपेवाडी, सदाशिव पेठ, पुणे; सातारा रस्ता, आळंदेवाडी, मंचर गोकर्णेश्वर मंदिर, शनिवार वाडा, सिंहगड रस्ता येथील शिवकाशीनर्मदेश्वर मंदिर, आंबेगाव, तळेगाव दाभाडे, सोरतापवाडी, हडपसर; शेवाळवाडी आदी एकूण 116 पेक्षा अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचे कार्यक्रम घेण्यात आले. यात विशेषत: युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा लाभ 6600 जणांनी घेतला.

या कार्यक्रमांची सुरुवात शंखनादाने झाली. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, श्री हनुमानाची आरती, मारुति स्तोत्रपठण केल्यानंतर ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ३ वर्ष सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत आणि यावर्षीही हिंदुत्वनिष्ठ आणि भाविक यांचा उत्तम सहभाग यात दिसून आला.
महाकालिका देवी मंदिर येथे पू.सौ. मनिषा पाठक यांच्या हस्ते कसबा पेठ शौर्य शिबिराच्या मुलांसोबत गदापूजन झाले. केडगाव येथील हिंदुत्वनिष्ठ, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचचे अध्यक्ष डॉ. निलेश लोणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन वीर सावरकर ग्रंथालय, केडगाव येथे गदा पूजन केले.खासदार प्रा (डॉ.)मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्येश्वर मारुती मंदिर येथे गदापूजन करण्यात आले. या वेळी मारुतीस्तोत्र पठण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञाही घेण्यात आली.
या ‘गदापूजना’मागील भूमिका स्पष्ट करताना हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले म्हणाले, मारुतीरायांची ‘गदा’ हे केवळ युद्धातील अस्त्र नव्हे, तर ती धर्मरक्षणाचा संकल्प, अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतिक आहे. आज अयोध्येत श्रीरामलल्ला विराजमान झाले आहेत, हा एक ऐतिहासिक क्षण आहे, पण श्रीरामाचे कार्य अजून अपूर्ण आहे. मंदिर उभारले, आता रामराज्य घडवण्याचे दायित्व आपल्या सर्वांवर आहे. हे कार्य हनुमानासारखे शौर्य, निष्ठा, त्याग आणि सामर्थ्य यांच्याशिवाय शक्य नाही. म्हणूनच या वर्षीही देशभरात गदापूजनाच्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत करण्याचा आणि रामराज्याच्या दिशेने सामूहिक वाटचाल करण्याचा निर्धार करायचा आहे’.