मंगेशकरचे डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई

0
44

पुणे, दि. ९ : गरोदर महिलेला डिपॉझिट न भरल्यामुळे उपचार नाकारुन तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका असणाऱ्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याप्रकरणात केंद्रस्थानी असलेल्या डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात कारवाई होऊ शकते. येत्या दोन दिवसांमध्ये त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संतापाची लाट उसळली होती. राज्यभरात याप्रकरणाचे पडसाद उमटू लागल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल प्रधान सचिवांकडे सुपूर्द केला होता. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चाही झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर सर्वप्रथम कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे दिसत आहे.

उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालानुसार डॉ. सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याची माहिती आहे. धर्मादाय रुग्णालय असल्यामुळे आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न गटातील तनिषा भिसे यांच्यावर तातडीने उपचार करणं ही रुग्णालयाची जबाबादारी होती, असे धर्मादाय कायदा सांगतो. मात्र,दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या नियमाचा भंग झाल्याचे दिसत आहे, असे संबंधित अहवालात नमूद केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘डिपॉझिट घेत नाही, पण त्या दिवशी राहू-केतू काय झालं माहिती नाही’
तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात टीकेची झोड उठली होती. त्यामुळे डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला होता. यानंतर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांकडून डिपॉझिट मागण्यात आल्याची कबुली दिली. आमच्याकडे अर्जावर डिपॉझिट लिहायची पद्धत नाही. पण त्यादिवशी राहू-केतू काय झालं माहिती नाही, पण 10 लाखांची डिपॉझिट मागितले. मी दररोज 10 शस्त्रक्रिया करतो. आजपर्यंत किती केल्या असतील, पण मी कधीही असं डिपॉझिट मागितले नाही, असे धनंजय केळकर यांनी सांगितले.

भाजप आमदार अमित गोरखे आक्रमक
तनिषा भिसेंच्या मृत्यूप्रकरणाचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर सादर करण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्त आणि यमुना जाधवांनी चौकशी केलेल्या या अहवालात ही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी धरण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या अहवालानंतर मुख्यमंत्र्यांशी भेट घेतलेले भाजपचे विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांनीही डॉ. सुकृत घैसास यांना दोषी धरल्याची प्राथमिक माहिती मला प्राप्त झालीये, असा दावा केला. मात्र, याप्रकरणी डॉक्टर घैसासांनी राजीनामा दिला असताना गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई होताना दिसते. मात्र, माता मृत अन्वेषण समितीचा अहवाल सादर होताच, कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचा दावा गोरखे यांनी केला.