गुलाबो गँगकडून फेरीवाल्‍यांच्‍या डोळ्यात धुळफेक : आशा कांबळे

0
11

– न्‍यायालयाचा आदेश आहे मग फेरीवाल्‍यांवर कारवाई कशासाठी
– आशा कांबळे यांचा संभ्रम पसरविणाऱ्यांना सवाल

पिंपरी, दि. 7

फेरीवाल्‍यांवर कारवाई होणार नसल्‍याचा उच्‍च न्‍यायालयाने आदेश दिल्‍याचे सांगत गुलाबो गँग आणि काही लोकांनी गुलाल उधळून स्‍वागत केले खरे. मात्र दुसऱ्याच बाजूला शहरातील काही फेरीवाल्‍यांना महापालिकेच्‍या कारवाईला सामोरे जावे लागल्‍याची घटना घडली आहे. त्‍यामुळे न्‍यायालयाचा आदेश आहे तर तो दाखवून अधिकाऱ्यांना कारवाईपासून का रोखले नाही. न्‍यायालयाच्‍या आदेशाचे कारण सांगून गुलाल उधळणारी गुलाबो गँग फेरीवाल्‍यांच्‍या डोळ्यात धुळफेक करत आहे का, असा परखड सवाल पिंपरी-चिंचवड महापालिका फेरीवाला समितीच्‍या सदस्य आशा बाबा कांबळे यांनी उपस्‍थित केला आहे.
न्‍यायालयाच्‍या आदेशाची प्रत जाहिर करून फेरीवाल्‍यांमधील संभ्रम दूर करावा, असे आवाहनही आशा कांबळे यांनी गुलाबो गँगला केले आहे.

आशा कांबळे यांनी दिलेल्‍या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात असंख्य गोरगरिब फेरीवाले आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्‍यांना शासनाने फेरीवाला कायद्यांतर्गत योग्य संरक्षण आणि सुविधा देणे अपेक्षित आहे. मात्र त्‍याकडे दुर्लक्ष करत शासन यंत्रणा कारवाईचा बडगा उगारत आहे. अनेक फेरीवाल्‍यांची वाहने जप्‍त करत त्‍यांचा संसार उघड्यावर आणत आहे. या फेरीवाल्‍यांची लढाई योग्य रितीने लढून त्‍यांना न्‍याय देणे अपेक्षित आहे. मात्र काही लोक चुकीचा संदेश पसरवून फेरीवाल्‍यांची दिशाभूल करताना दिसत आहेत.

नुकतेच उच्‍च न्‍यायालयाने फेरीवाल्‍यांवर कारवाई करू नये असा आदेश दिल्‍याचे काहींनी सांगितले. तसा निर्णय झालाच असेल तर त्‍या निर्णयाचे पेढे अथवा साखर वाटून स्‍वागत करणे अपेक्षित आहे. मात्र काहींनी गुलाल उधळत चुकीची प्रथा आणली. तसेच न्‍यायालयाच्‍या आदेशाची प्रत फेरीवाल्‍यांसमोर सादर केले पाहिजे. तसे होताना दिसत नाही. हा आदेश आहे तर शहरातील फेरीवाल्‍यांवर होणारी कारवाई का रोखली जात नाही, असा सवाल आशा कांबळे यांनी उपस्‍थित केला. न्‍यायालयाच्‍या निर्णयाचा अवमान केला म्‍हणून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होणे अपेक्षित आहे. त्‍यामुळे या गुलाबो गँगने फेरीवाल्यांच्या डोळ्यात गुलाल फेकणे थांबून, दिशाभूल थांबवून योग्य संदेश द्यावा, अशी मागणी आशा कांबळे यांनी केली.

परप्रांतिय फेरीवाल्‍यांवर आळा घाला…
सध्या पिंपरी-चिंचवड शहरात फेरीवाले म्‍हणून परप्रांतिय उघड माथ्याने फिरत आहेत. त्‍यांच्‍यामुळे स्‍थानिक गरजू फेरीवाल्‍यांना अपेक्षित न्‍याय मिळत नाही. असे फेरीवाले शोधून त्‍यांच्‍यावर अधिकाऱ्यांनी कारवाई करावी. तसेच स्‍थानिक फेरीवाल्‍यांना खऱ्या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी आशा कांबळे यांनी केली.