दिशा सालियनच्या मृत्यूच्या प्रकरणात तिच्या वडिलांनी दिलेला जबाब समोर आला आहे. या जबाबात त्यांनी काही खासगी बाबी स्पष्ट करत त्या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. समोर आलेल्या माहितीनूसार, हा जबाब मालवणी पोलिसांसह एसआयटीकडेही देण्यात आला होता.
दिशाचे वडील सतीश सालियान यांनी त्यांच्या संपर्कात असलेल्या एका महिलेला मदत करण्यासाठी काही रक्कम दिल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यांनी सांगितलं की लॉकडाऊन काळात त्यांच्या दिवंगत मित्राच्या पत्नीला आर्थिक मदतीची गरज होती. त्यामुळे त्यांनी किराणा खर्चासाठी त्या महिलेला मदत केली. हे पैसे ते आपल्या खात्यातून थेट देत नव्हते, तर एका मित्राच्या माध्यमातून रोख स्वरूपात देत होते. मात्र या प्रकरणामुळे दिशा आणि सतीश यांच्यात वाद निर्माण झाला होता.
दिशाला वाटत होतं की वडील अजूनही त्या महिलेला पैसे देत आहेत, कारण सतीश यांचे व्हॉट्सअप मेसेज तिच्या लॅपटॉपवर दिसत होते. त्यातून गैरसमज निर्माण झाला होता. त्यामुळे सतीश यांनी स्वतःच्या खात्यातून पैसे देणं थांबवलं होतं. मात्र त्या काळात झालेल्या गैरसमजांमुळे त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला होता, अशी माहितीही त्यांनी दिली.
दिशाच्या मृत्यूपूर्वी सहा दिवसांपूर्वी सतीश सालियान यांनी पुन्हा एकदा आपल्या मित्राच्या माध्यमातून त्या महिलेला तीन हजार रुपये पाठवले होते. त्यांनी रोख रक्कम मित्राकडे दिली आणि ती रक्कम संबंधित महिलेला पाठवण्यास सांगितले. मित्राने पैसे पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट सतीश यांना पाठवला होता. मात्र दिशा तिच्या लॅपटॉपवर हे मेसेज वाचत होती, आणि त्यामुळे वडिलांनी अजूनही महिलेला पैसे देत असल्याचा तिला संशय आला.
ही बाब लक्षात आल्यावर 2 जून 2020 रोजी दिशाने वडिलांशी याबाबत जोरदार वाद घातल्याचं समजते. त्या काळात आर्थिक अडचणी असतानाही वडिलांनी इतरांना मदत केल्याने दिशा नाराज होती. दरम्यान, सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दिशाची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केली आहे. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.