शिवरायांकडे वाघ्या नावाचा असा कुठला कुत्रा होता का?

0
34

दि . २६ ( पीसीबी ) – गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा वाद चर्चेत आल्याचं दिसत आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याचं स्मारक रायगडावरून हटवण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र राज्य सरकारला दिलं आहे. मात्र, त्यांच्या या मागणीनंतर वाघ्या कुत्र्याच्या ऐतिहासिक संदर्भांबाबत शोध घेतले जाऊ लागले. खरंच शिवरायांकडे वाघ्या नावाचा असा कुठला कुत्रा होता का? यावर चर्चा सुरू झाली. त्यासंदर्भात आता खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनीच पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे.

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. या समाधीची उंची छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपेक्षाही जास्त आहे. याआधीही अनेकदा वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसल्याचा मुद्दा अनेक शिवप्रेमींनी उपस्थित केला होता. आता संभाजीराजे छत्रपतींनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाघ्या कुत्र्याच्या समाधीसंदर्भात स्पष्टीकरण दिलं. यासाठी त्यांनी पुरातत्व विभागाकडून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीचा दाखला दिला. “आज मी पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली. त्यांना सविस्तर इतिहास सांगितला. माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून अनेक शिवभक्तांनी पुरातत्व खात्याकडून जे मिळवलं होतं, त्याची मांडणी तिथे केली”, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

“पुरातत्व खात्याने माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे सांगितलं आहे की वाघ्या कुत्र्याचं स्मारक याची त्यांच्या सुरक्षित स्थळांच्या यादीत कुठेही नोंद नाही. वाघ्या कुत्र्याचं स्मारक १९३६ ला पूर्ण झालं. २०३६ पर्यंत ते स्मारक काढलं नाही तर त्याची नोंद संरक्षित स्थळांच्या यादीत समाविष्ट होईल ही माहितीही पुरातत्व खात्याने दिली आहे. त्यामुळे हा विषय मी घेतला आहे. अनेक शिवभक्तांनीही पूर्वी हा विषय घेतलेला आहे. दुर्दैवाने त्यावर न्याय मिळाला नाही म्हणून मी ही मागणी पुन्हा करतोय”, असं त्यांनी नमूद केलं.

वाघ्या कुत्र्यानं खरंच चितेत उडी घेतली का?
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना अग्नी दिला जात होता तेव्हा वाघ्या कुत्र्यानं त्यात उडी घेतल्याचे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नाहीत, असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. “१९२५ ला छत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार व्हायच्या आधीची काही छायाचित्र आहेत. १९२६ ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती. त्या समितीनं स्मारकाचा जीर्णोद्धार पूर्ण केला. त्यावेळी पुरातत्व खात्याने दोन हजार रुपये दिले होते. तेव्हाच्या सरकारने पाच हजार रुपये दिले होते. तेव्हा अनेक शिवभक्तांनीही स्मारकासाठी मदत केली होती. त्यातून शिवरायांचं स्मारक पूर्ण झालं”, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

“वाघ्या कुत्र्याचं स्मारक का उभं राहिलं? यावर अनेक वाद आहेत. महाराष्ट्रातल्या एकाही इतिहासकाराने सांगितलेलं नाही की वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणून. शिवाजी महाराजांच्या काळात कुत्रे असू शकतात. स्वत: महाराजांचेही काही कुत्रे असू शकतात. पण राज संन्यास या नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली. त्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. त्यातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण झाली आणि त्याचं स्मारक तिथे बांधण्यात आलं”, असंही त्यांनी नमूद केलं.