उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील केलेल्या अप्रत्यक्ष टीकेचे विडंबन गीत प्रचंड वादग्रस्त ठरल्यानंतर आता कुणाल कामराने पुन्हा एकदा नवं गाणं प्रसिद्ध केलं आहे. त्यानं आता एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केलाय. यामध्ये हम होंगे कामयाब या गाण्याची चाल लावण्यात आली आहे. या गाण्यावरही त्याच्या समर्थनार्थ अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
प्रसिद्ध विनोदी कलाकार कुणाल कामरा याने दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारं एक गाणं एका शोमध्ये सादर केलं. त्याचा व्हिडिओ त्याच्याच अकाऊंटमधून व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिंदेंची शिवसेना प्रचंड आक्रमक झाली. त्यामुळे हा शो ज्या क्लबमध्ये झाला त्या हॅबिटॅट क्लबची शिवसैनिकांनी नासधूस केली. एवढ्यावरच ते न थांबता कुणाल कामराविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. याप्रकरणी विधानसभेतही खडाजंगी पाहायला मिळाली.
विरोधकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचं सांगत कुणाल कामराच्या गाण्याचं कौतुक केलं. तर ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांनी आक्रोश केला. विधानसभेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत कुणाल कामराविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, यानंतर कुणाल कामरा गप्प बसेल तर शप्पथ. त्याने काल (२४ मार्च) रात्री भलीमोठी पोस्ट करून माफी मागणार नाही, असं स्पष्टीकरण दिलं. तर आज त्याने थेट पुन्हा एक नवं खोचक गीत सादर केलं आहे. यामध्ये त्याने युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल यांना लक्ष्य केलं आहे.
विकसित भारताचं आणखी एक राष्ट्रगीत असल्याचं म्हणत हम होंगे कामयाब या गाण्याच्या धर्तीवर त्याने हम होंगे कंगाल हे गाणं रचलं. हे गाण्याच्या व्हिडिओमध्ये काल दिवसभरात जो धुमाकूळ झालाय त्याचे क्लिप्सही अॅड करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा हा व्हिडिओही अल्पावधित व्हायरल झाला आहे. आता या गाण्यावरूनही पुन्हा धुमश्चक्री होण्याची शक्यता आहे.