- खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) : पुणे ते लोणावळा दरम्यानची तिसरी आणि चौथी मार्गिका जमीन अधिग्रहण न झाल्याने रखडली आहे. पनवेलमध्ये देशातील सर्वात मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम करावे. त्यामुळे पनवेल पासून थेट पुण्यापर्यंत जलद रेल्वे धावू शकतात. दुपारी दीड वाजता लोणावळावरून पुण्याला जाणारी लोकल पुन्हा सुरू करावी. अमृत भारत योजनेत कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकाचा समावेश करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत केली.
केंद्र सरकारच्या २०२५-२६ या अर्थसंकल्पावरील चर्चेत खासदार श्रीरंग बारणे सहभाग घेतला. शिवसेनेच्या वतीने अर्थसंकल्पावर चर्चा केली. अर्थसंकल्पाचे स्वागत करतानाच मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे प्रश्न पुन्हा एकदा सभागृहात मांडले. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, अर्थसंकल्पात रेल्वेच्या विकासासाठी महत्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यकाळात रेल्वेचे मोठे काम झाले. अनेक वर्षे ही कामे झाली नव्हती. रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी अर्थसंकल्पात २.५२ लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. मागील काही अर्थसंकल्पाच्या तुलनेत चार पटीने जास्त हा निधी आहे. पुढील तीन वर्षात १०० अमृत भारत ट्रेन, ५० नमो भारत ट्रेन आणि २०० वंदे भारत ट्रेन तयार करण्यात येणार आहेत. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे विस्तार, रेल्वे विकासासाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
महाराष्ट्राला सर्वाधिक २३ हजार ७७८ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामुळे राज्यातील रेल्वेला गती मिळेल. शत प्रतिशत रेल विद्युतीकरण प्राप्त करणारे महाराष्ट्र प्रमुख राज्य आहे. यामुळे विजेची बचत होते. पर्यावरणाचे संरक्षण होत आहे. २०१४ पासून आतापर्यंत २ हजार १०५ किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकास केला जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, तळेगाव दाभाडे, लोणावळा, पनवेल जंक्शनचा या योजनेअंतर्गत विकास केला जात आहे. कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकाचा या योजनेत समावेश करावा. हा मार्ग मुंबईपासून पुण्यापर्यंत जातो. या मार्गावरून सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या योजनेत सहभागी करून घेऊन विकसित करावा. जेणेकरून प्रवाशांना सुविधा मिळतील. रेल्वे मार्गिकेच्या निर्माणासाठी ५० ते ६० टक्के किलोमीटर वाढवून १८३ किलोमीटर केले आहे. २०१४ पासून आतापर्यंत ४० हजार किलोमीटर अधिक रेल्वे लाइनचे विद्युतीकरण केले आहे. सौर, पवन ऊर्जाच्या माध्यमातून रेल्वे विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण केली जात आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी जागेचे भूसंपादन करा
अर्थसंकल्पात घोषणा केली जाते. परंतु, प्रत्यक्षात वर्षानुवर्षे काम होत नाही. जागेचे भूसंपादन होत नाही. राज्य सरकारचा प्रतिसाद मिळत नाही. मावळ लोकसभा मतदारसंघात २०१७ मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेची घोषणा केली होती. केंद्र सरकारने मंजुरी दिली. अर्थसंकल्पात त्याचा उल्लेखही केला होता. परंतु, जमीन अधिग्रहण व अन्य कारणांमुळे अद्यापही तिसरा आणि चौथा मार्ग रखडला आहे. मुंबईवरून पुण्याला जाणारा, सर्वाधिक वाहतूक असलेला हा मार्ग आहे. हा मार्ग झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. पुणे ते लोणावळा दरम्यान लोकल ट्रेन धावते. कोरोना काळात दुपारच्या वेळेत रेल्वे बंद केली होती. याबाबत अनेकदा पाठपुरावा करून बारा वाजता ट्रेन चालू केली. परंतु, दुपारी दीड वाजताची लोकल ट्रेन बंद असल्याने कामगार, महिला, विद्यार्थी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दीड वाजता लोणावळावरून पुण्याला जाणारी लोकल पुन्हा सुरू करावी, असेही खासदार बारणे म्हणाले.
कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसरी, चौथी मार्गिका करा
पनवेल आणि कर्जतच्या दरम्यान नवीन रेल्वे मार्ग बनत आहे. हा मार्ग लवकरच पूर्ण होईल. पनवेलमध्ये देशातील सर्वात मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे कर्जत ते लोणावळा आणि लोणावळा ते पुण्यापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम करावे. त्यामुळे पनवेल पासून थेट पुण्यापर्यंत जलद ट्रेन धावू शकतात. त्यामुळे विमानतळावर येणाऱ्या नागरिकांसह मुंबई, पनवेल, पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा निर्माण होईल. पनवेल ते मुंबई दरम्यान लोकल ट्रेन धावत आहे. दीड लाख दररोज प्रवास करतात. सिडकोने बनविलेल्या रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव आहे. रेल्वे विभागाने सिडकोसे चर्चा करून सुविधा निर्माण कराव्यात. माथेरानमध्ये नेरळपासून ट्रॉयट्रेन धावत आहे. पूर्वी दोन तासात जाणाऱ्या या ट्रेनला आता तीन तास लागत आहेत. येथे वर्षाला दहा लाख पर्यटक येतात. परंतु, एकच ट्रॉयट्रेन आहे. ट्रॉयट्रेनची संख्या वाढवावी. देशात पहिल्यांदाच विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकावर सुविधा दिल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानक मॉडेल बनविण्याचे काम रेल्वे विभागाने केले आहे. प्लँटफॉर्मवर सुविधा दिल्या जात आहेत. रेल्वे स्थानकावर क्रांतिकारकांची माहिती द्यावी. प्रवाशांना इतिहासाची माहिती मिळेल. कोरोना काळात बंद केलेल्या ट्रेन, थांबे, चालू करावे तिकीट दरातील ज्येष्ठ नाहरिकांची सवलत योजना पुन्हा चालू करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली.