मुंबई, दि. १८ (पीसीबी) : महाराष्ट्रात शेतमालाला भाव नाही, आमचा शेतकरी रोज आत्महत्या करतोय, तरुणांच्या हाताला रोजगार नाही, आया बहिणी सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत राज्य सरकारच्या मदतीला धावून आलाय औरंग्या… औरंग्याच्या कबरीने अचानक डोकं वर काढलंय… आता या कबरीचं करायचं काय? असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. उगाच इतिहासातील कुठल्यातरी दाखल्यांवरुन एकमेकांची डोकी फोडत हे राज्य अशांत करु नका, असं आवाहन अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे, की गेले काही दिवस महाराष्ट्रात औरंग्याच्या कबरीवरुन वाद सुरु आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते राजकीय विधानं करत आहेत. त्यात आज तेलंगणाचे भाजप आमदारांनी आगीत तेल ओतण्यासारखं काम केलं आणि वाद आणखी चिघळण्याची परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे, की क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमामंडन केलं जाऊ नये, ते सहन केलं जाणार नाही, हीच प्रत्येक शिवशंभू भक्ताची भावना आहे, आणि त्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.
त्याचवेळी क्रूरकर्मा औरंग्याची कबर ही मराठ्यांच्या असीम शौर्याचं प्रतीक आहे. जो महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहील, त्याची अवस्था हीच होईल, हे हिंदुस्थानाला दाखवून देणारी ही कबर आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने या परिसरात मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभे केलं पाहिजे, अशी मागणी मी संसदेत करणार असल्याचं अमोल कोल्हे म्हणाले.