शिंदेचा आमदार अडचणीत!, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे धक्कादायक आरोप –

0
4

महाराष्ट्र : दि. १८ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मराठी अभिनेत्री हेमांगी राव यांनी गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे थोरवे ऐन अधिवेशनाच्या काळात अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खालापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हेमांगी राव यांनी या प्रकरणाचा खुलासा करत आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. त्यांनी या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
जमिनीच्या वादातून वादंग, आमदार थोरवे यांच्यावर आरोप :

हेमांगी राव यांच्या म्हणण्यानुसार, खालापूर तालुक्यातील कांढरोली गावाजवळ त्यांची जमीन असून या जमिनीचा वाद आहे. यापूर्वी नवी मुंबईतील बिल्डर दीपक वाधवा यांच्याशी या जमिनीचा व्यवहार ठरला होता, मात्र तो पूर्ण होऊ शकला नाही. सद्यस्थितीत राव आणि त्यांचे पती या जमिनीवर नवीन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत होते. मात्र, या प्रकल्पाला बिल्डर दीपक वाधवा यांच्या गुंडांकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हेमांगी राव यांनी अधिक गंभीर आरोप करत म्हटले आहे की, बिल्डर वाधवा हे त्यांची जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात असून, त्याला स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांची साथ आहे. एवढेच नव्हे, तर स्थानिक पोलिसांनीही कोणतीही कारवाई न करता दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर हेमांगी राव यांनी खालापूर पोलीस ठाण्यात महेंद्र थोरवे आणि दीपक वाधवा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणाची माहिती देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, ही जमीन जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असून, या जमिनीचा व्यवहार तब्बल ११ कोटींना ठरला होता. मात्र, व्यवहार पूर्ण झाला नसतानाही वाधवा यांनी आता वर्षांनंतर त्यावर हक्क सांगितला आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

या प्रकरणात आमदार महेंद्र थोरवे यांचे नाव समोर आल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. थोरवे हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांचे विरोधक या प्रकरणाचा राजकीय लाभ घेत त्यांच्यावर हल्लाबोल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिल्डरच्या मदतीने जमिनीवर कब्जा करण्याचा कट असल्याचा आरोप होत असल्याने या प्रकरणाचा परिणाम थेट राज्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता आहे.