दि . १७ ( पीसीबी ) – कळवणमध्ये काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. शीतल महाजन असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. त्या काँग्रेसच्या एकनिष्ठ नेत्या मानल्या जातात. त्यांनी अजित पवार गटाचे कळवणचे आमदार नितीन पवार यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला. आमदार नितीन पवार हे आपल्या पतीला वारंवार त्रास देतात, त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. त्यांनी अभोणा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
आपल्या ग्रामसेवक पतीविरोधात विविध तक्रारी करून आणि अधिवेशनात पतीविरोधात लक्षवेधी मांडण्याचा प्रस्ताव टाकून आमदार नितीन पवार त्रास देत असल्याचं महिलेचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुकीत आपण विरोधात काम केल्याचा राग काढत असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. दुसरीकडे, आमदार नितीन पवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. महिलेने केलेल्या आरोपात कुठलंही तथ्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.