पिंपरी, दि. १६ – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पिंपरी बाजारपेठेतील पथारीवाल्यांचे अतिक्रमणावर कारवाई करायचे सोडून मूळ व्यापाऱ्यांनाच मारझोड सुरू केल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. दोन दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून चुकिच्या पध्दतीने होणाऱ्या अतिक्रमण कारवाईचा निषेध केला. दरम्यान, या प्रकणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून मूळ व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, अशी लेखी मागणी निवेदनाद्वारे पिंपरी मार्केट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी केली आहे.
पिंपरी बाजारपेठेतील बहुसंख्य व्यापारी हे निर्वासीत बांधव आहेत. ५० लाख ते १ कोटी रुपये खर्चुन त्यांनी स्वतःची दुकाने सुरू केलीत. अत्यंत मेहनतीने सर्व व्यापारी कुटुंबांनी मिळून या बाजारपेठेची पत, प्रतिष्ठा वाढवली. स्वातंत्रोत्तर काळातील या भागातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नालौकीक आहे. बाजारपेठेतील रस्त्यांच्या दुतर्फा सर्व व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर बेकायदा पथारीवाले बसतात आणि रस्ता अडवतात. त्यांच्या विरोधात अतिक्रमण कारवाई होणे अपेक्षित आहे, प्रत्यक्षात दुकानदारांवर कारवाई केली जाते. या विषयावर पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त यांना वारंवार निवेदन देण्यात आले मात्र, अद्याप पर्यंत तोडगा निघालेला नाही. अतिक्रमण पथकाचे अधिकारी या बेकायदा पथारीवाल्यांवर कारवाई सोडून दुकानदारांचाच माल जप्त करत असल्याने समस्त व्यापारी प्रचंड संतापले आहेत, असे श्रीचंद आसवाणी यांनी निवेदनात म्हटले आहे.
बाजारपेठेत अतिक्रमण होऊ नये म्हणून फेडरेशनच्या वतीने १५ सुरक्षारक्षक तैनात केले जातील. महापालिका आणि पोलिस आयुक्त यांनी त्यांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी नियुक्त करावेत. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत हे पथक अतिक्रमण होऊ नये यासाठी काम करेल. अशा पध्दतीने प्रश्न कायमचा निकाली काढून बाजारपेठेतील रस्त्यांवरची अतिक्रमणे होणार नाहीत यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करू, अशी ग्वाही श्रीचंद आसवाणी यांनी निवेदनात दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयात लक्ष घालून प्रशासनाला आदेश करावेत अशी मागणी आसवाणी यांनी केली आहे.