पिंपरी, दि. १५ नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक १४ मार्च २०२५ रोजी तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, पेठ क्रमांक २९, रावेत येथे आयोजित केलेल्या ‘रंगात रंगुनी सार्या…’ या विनोदी, विडंबन कविसंमेलनात श्रोते हास्यरंगात चिंब झाले. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ एकपात्री कलाकार आनंद मुळूक, श्री संत तुकाराममहाराज सहकारी साखर कारखाना संचालक चेतन भुजबळ, कामगार नेते हेमंत कोयते, ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, नवयुगचे कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, संचालक प्रा. पी. बी. शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मोरेश्वर भोंडवे यांनी, ‘कवितांनी आज आनंद दिला. आईवडील हयात नसल्याने कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तींमध्ये मी त्यांचे रूप पाहतो!’ अशी हृद्य भावना व्यक्त केली. चेतन भुजबळ यांनी, ‘लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून पुण्याचा सांस्कृतिक वारसा आता पिंपरी – चिंचवडमध्ये रुजतो आहे!’ असे मत व्यक्त केले. आनंद मुळूक यांनी “मोबाइलनं येडं केलंया…” या कवितेच्या माध्यमातून मोबाइलच्या अतिवापरावर मार्मिक भाष्य केले. याप्रसंगी डायलिसिसचे उपचार घेणारे ज्येष्ठ कवी बाबू डिसोजा आणि कवितेच्या निस्सीम प्रेमापोटी व्हीलचेअरवरून आलेल्या मंगला पाटसकर; तसेच कार्यक्षम मुख्याध्यापिका वंदना इन्नाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
‘रंगात रंगुनी सार्या…’ या कविसंमेलनात भूपेंद्र आल्हाट, सूर्यकांत भोसले, शिवाजी जगताप, मयूरेश देशपांडे, सुखदा टांकसाळे, नागेश गव्हाणे, राजेंद्र पगारे, माधुरी डिसोजा, प्रा. नरहरी वाघ, आय. के. शेख, प्रदीप गांधलीकर, अरुण कांबळे, हेमंत जोशी, जितेंद्र रॉय, धनंजय इंगळे, कैलास भैरट, अशोक सोनवणे, शोभा जोशी, प्रतिमा काळे, शामला पंडित, योगिता कोठेकर, सीमा गांधी, सुभाष चव्हाण, सविता इंगळे यांनी स्वरचित कवितांचे तसेच प्रथितयश कवींच्या लोकप्रिय रचनांचे प्रभावी सादरीकरण केले. दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सहभागी कवी तसेच मान्यवरांवर पुष्पपाकळ्या आणि फुलांची उधळण करीत पर्यावरणपूरक धुळवड साजरी करून गंधित अन् आनंदित वातावरणात कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
अश्विनी कुलकर्णी, अनिकेत गुहे, माधुरी विधाटे, प्रा. पी.बी. शिंदे, संपत शिंदे, रजनी अहेरराव, शरद काणेकर, नेहा कुलकर्णी, उज्ज्वला केळकर, तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघाचे शिरीष कुंभार, दिलीप क्षीरसागर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. नवयुगचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी सूत्रसंचालन केले; तर सचिव माधुरी ओक यांनी कविसंमेलनाचे निवेदन केले. उपाध्यक्ष राजेंद्र घावटे यांनी आभार मानले.