पंडित गँग’च्या म्होरक्या अखेर पोलिसांच्या जाळ्यात

0
5

पुणे, दि. १५ : खुनाच्या आणि मोक्क्याच्या गुन्ह्यात गेली दोन वर्षे फरार असलेल्या ‘पंडित गँग’च्या म्होरक्याला दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसासोबत पकडण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले. सुर्यकांत उर्फ पंडित उर्फ पिंटू उर्फ भाऊ दशरथ कांबळे (वय २९, रा. ताडीवाला रोड, पुणे) असे अटक अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे. दांडेकर पूल परिसरातून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मंगळवारी (११ मार्च) शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे हे आपल्या पथकासह गस्तीवर होते. त्यावेळी पोलीस नाईक सचिन जाधव यांना गुंड पंडित कांबळे याच्याबद्दल माहिती मिळाली . कांबळे हा दांडेकर पूल परिसरात येणार असल्याचे जाधव यांना आपल्या बातमीदाराद्वारे समजले. त्यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांना कळवली. तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार सापळा रचून दांडेकर पुल परिसरातून कांबळे याळा ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी कायदेशिर कारवाई करीत त्याला अटक केली. कांबळे याच्याकडून दोन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंग गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस हवालदार रुपेश वाघमारे, भाऊ चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर चलटे, अतुल साठे, पोलीस अंमलदार सचिन जाधव, प्रविण दडस, सुदाम तायडे, श्रीकृष्ण सांगवे यांनी केली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे करीत आहेत.

१९ महिन्यांपासून फरार

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पंडित कांबळे हा गेल्या १९ महिण्यांपासून फरार असल्याचे उघडकीस आले. या काळात तो नेहमी जागा बदलून राहायचा. तो कोणताही मोबाईल फोन वापरत नव्हता. त्यामुळे त्याचा सुगावा लागणे कठीण होते. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन वाटसरूंना अडवून त्यांचे मोबाईल फोन काढून घ्यायचा आणि त्या मोबाईल फोनच्या माध्यमातून तो आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधायचा. अशा पद्धतीने तो पोलिसांची दिशाभूल करायचा.