पिंपरी, दि. १३ –
पिंपरी चिंचवड शहराला मोठा राजकीय इतिहास आहे आणि राजकीय नेतृत्वाची मोठी परंपरा आहे.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या कृषीऔद्योगिक दृष्टिकोनातून हे शहर औद्योगिक नगरी म्हणून उदयाला आले.लोकनेते शरदचंद्र पवार यांच्या दूरदृष्टीमुळे येथील उद्योगवाढीला चालना मिळाली.मात्र अलीकडच्या काळात राजकीय नेतृत्वामधील विकासात्मक दृष्टिकोनाच्या अभावामुळे शहर विकासाला अपेक्षित गती मिळताना दिसत नाही.सुनियोजित शहर विकासासाठी राजकीय दूरदृष्टी हवी! असे मत शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी किमया कम्युनिकेशन्सच्या वतीने पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात अध्यक्षस्थानावरून बोलताना मांडले.
आपल्या संबोधनात वाघेरे पुढे असे म्हणाले की,पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांनी शहरातील स्थानिक कारभारी मंडळींना बरोबर घेऊन येथील गावसमूहाची एक शहर म्हणून उभारणी केली.त्यापुढे जाऊन प्रा. रामकृष्ण मोरे यांनी या शहराचे महानगरात रूपांतर होताना महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.सद्यःस्थितीला नेतृत्वामधील राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि प्रशासनाचा वाढता प्रभाव शहरविकासाला मारक ठरत आहे,अशी खंत वाघेरे यांनी व्यक्त केली.
किमया कम्युनिकेशन्सचे संचालक ब्रँड कन्सल्टंट जयंत शिंदे यांनी आपल्या बीजभाषणात शहर विकासाचे नेक्स्ट व्हिजन याबाबत आपली भूमिका विशद केली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या विकासात्मक दृष्टिकोनाचे दस्तावेजीकरण व्हावे आणि त्यातून शहर विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट साकारावे यासाठी किमया कम्युनिकेशन्स प्रयत्नशील राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘विकासाचा प्राधान्यक्रम लोकांनी ठरविला पाहिजे व विकासाला मानवी चेहरा लोकप्रतिनिधींनी दिला पाहिजे!’ असे मिशन स्टेटमेंट करत त्यांनी शहरातील राजकीय प्रतिनिधींच्या पॉलिटिकल व्हिजनला ‘व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये महत्त्वपूर्ण स्थान असेल हे स्पष्ट केले.आणि यापुढे असे परिसंवाद वेळोवेळी आयोजित केले जातील हेही सांगितले.
शहर विकासाचे नेक्स्ट व्हिजन याबाबत विषय प्रतिपादन करताना शहरातील सोशल फोरमचे संयोजक इंजि.देवेंद्र तायडे म्हणाले की,पिंपरी चिंचवड शहर हे खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन शहर आहे.या शहरात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.मात्र शहरात ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ असे दोन वर्ग प्रामुख्याने आढळून येतात.या दोन वर्गात विकासाबाबत मोठी तफावत आढळून येते.’नाही रे’ वर्गाला विचारात घेऊन विकासाचे नियोजन करायला हवे.सध्या शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा पूर आला आहे.परंतु एकंदरीत राजकीय नूर पाहता नेमके पुनर्वसन कोणाचे होणार?हा खरा प्रश्न आहे.पात्र लाभार्थींना घरे मिळालीच पाहिजे.मात्र आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांची सोय लावण्याचे प्रयत्न राज्यकर्त्यांकडून व्हायला नकोत.शिवाय अशा प्रकल्पांचे योग्य ते नियोजन केले नाही तर पत्र्यांच्या झोपडपट्टया जावून काँक्रीटच्या झोपडपट्टया उभ्या राहण्याचा धोका संभवतो.गोरगरीबांना राहायला घर आणि घर चालविण्यासाठी रोजगार मिळायला हवा.मोफत शिक्षण आणि माफक दरात आरोग्य सुविधा मिळायला हव्यात.शहर विकासासाठी पॉलिटिकल अजेंड्याबरोबरच सोशल अजेंडा हाती घ्यायला हवा,असे ठाम प्रतिपादन तायडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त प्रवीण तुपे यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून शहरविकासाचे आपले व्हिजन मांडले.पायाभूत विकासाबरोबरच संस्थात्मक विकास व्हायला पाहिजे. शैक्षणिक संकुले,क्रीडांगणे यातून गुणवान विद्यार्थी आणि खेळाडू घडायला हवेत, यासाठी दर्जेदार सुविधांचे जाळे निर्माण करायला असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यातील समन्वय शहरविकासासाठी महत्त्वाचा असतो हे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.सायन्स पार्क सारखी स्वयंपूर्ण संस्था याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.वाढत्या लोकसंख्येची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे यासाठी पाणी मीटर बसविण्याचा निर्णय हा समन्वयातून घेतला गेला,हे त्यांनी आवर्जून सांगितले.’जल है तो कल है!’ असा सावधगिरीचा सल्लाही त्यांनी दिला.नेक्स्ट व्हिजनला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
शहरविकासाचे नेक्स्ट व्हिजन या परिसंवादास शहरातील नगरसेवक,राजकीय पदाधिकारी व विविध संस्थांचे प्रतिनिधी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या परिसंवादाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रदीप म्हस्के यांनी केले.