समतेचा संदेश देणाऱ्या शिवविवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा.

0
4

या शिवविवाह सोहळ्याची चर्चा केवळ धाराशिव जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रभर.

दि . १० ( पीसीबी ) – मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांच्या कन्या शिवमती तृप्ती आणि शिवमान रणजित यांचा शिवविवाह मोठ्या उत्साहात आणि सामाजिक जाणीव जपत पार पडला. धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे एका आगळ्यावेगळ्या आणि सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या शिवविवाह सोहळ्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. या विवाहाची वैशिष्ट्ये लक्ष वेधून घेणारी होती.
पुस्तकांनी भरलेले कपाट; अनोखी रुखवत परंपरा.
या शिवविवाहात सर्वसामान्य विवाहांप्रमाणे पारंपारिक वस्तू देण्यात आल्या नाहीत. सतीश काळे यांनी रुखवत म्हणून मुलीला पुस्तकांनी भरलेले कपाट भेट दिले. ही अनोखी संकल्पना समाजाला ज्ञान आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी होती. महाराष्ट्रात या कल्पनेचे जोरदार कौतुक होत आहे. आजवर सोने-चांदी भांडीकुंडी किंवा महागड्या भेटी रुखवतामध्ये दिला जातात. मात्र काळे यांनी हा पायंडा मोडून समाजासमोर वेगळा आदर्श ठेवल्याचे बोलले जात आहे.
लग्नपत्रिकेवर महापुरुषांचे विचार
या शिवविवाह सोहळ्याची आणखी एक खासियत म्हणजे शिवविवाहाच्या आमंत्रण पत्रिकेवर देव-देवतांचे फोटो न वापरता महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा छापण्यात आल्या. समतेचा विचार रुजवण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न काळे यांनी केला. त्यांच्या या निर्णयामुळे हा शिवविवाह आगळावेगळा ठरला आणि अनेकांनी याचे कौतुक केले.
समाजसुधारणेचा संदेश देणारी शिवविवाह सजावट
हा शिवविवाह पारंपारिक सोळ्यांपेक्षा वेगळा होता. शिवविवाह मंडपात महापुरुषांचे विचारधारेचे फलक लावण्यात आले होते. सामाजिक समतेच्या विचारांचे दर्शन घडवणाऱ्या या मंडपाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या विवाहात धर्मावर आधारित विधींऐवजी सामाजिक विचारांचा प्रभाव असल्याचे दिसून आले.
राज्यभरातून कौतुक.
या शिवविवाह सोहळ्याची चर्चा केवळ धाराशिव जिल्ह्यातच नव्हे. तर संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. समाजात बदल घडवण्याचा संदेश देणाऱ्या अशा उपक्रमांकमांचे महत्त्व वाढत असून. अनेकांनी या संकल्पनेचे अनुकरण करावे अशी भावना समाजातील अनेक लोकांनी व्यक्त केली आहे.
सतीश काळे यांनी मुलीच्या लग्नाला एक सामाजिक चळवळीचे स्वरूप दिले आणि समता. शिक्षण व विचारांची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाज सुधारण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हा स्पष्ट संदेश या शिवविवाह सोहळ्यात मिळाला. त्यामुळेच हा शिवविवाह महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे.