खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या जेजुरीत भाविकांसाठी ड्रेस कोड लागू

0
4

दि . १० ( पीसीबी ) – महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. विशेष म्हणजे ट्रस्टकडून त्यासाठीची नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे, पाश्चिमात्य म्हणजेच वेस्टर्न कपडे परिधान करुन भाविकांना जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेता येणार नाही. दरम्यान, जेजुरी देवस्थानचा हा नियम केवळ जेजुरीतील खंडोबा देवस्थानसाठी लागू असणार आहे.

पुरूष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असं देवस्थान ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आले आहे. फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड-कमी कपडे ट्रस्टला अपेक्षित नाहीत. त्यामुळेच, असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान, दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारची भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे, असेही मंदिर ट्रस्टने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जेजुरीला देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आजपासूनच हे नियम पाळायचे आहेत.

दरम्यान, जेजुरीचं खंडेराया हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असून आराध्य दैवत आहेत. त्यामुळे, दरवर्षी येथे लग्नसराईनंतर आणि बारामाही देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. विशेष म्हणजे चंपासष्टीला देखील भाविक मोठ्या संख्येने जेजुरी गडावर दर्शनासाठी येतात. चंपाषष्ठीच्या दिवशी कुलधर्म असतो. या दिवशी खंडोबाला महानैवेद्य अर्पण करतात. त्यात ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ असतात. ठोंबरा हे नाव काहींना अपरिचित वाटेल. जोंधळे शिजवून त्यात दही, मीठ घालून केलेल्या पदार्थाला ठोंबरा म्हणतात. तसेच गव्हाच्या लोंब्या, हुरडा, तीळ आणि गूळ हे पदार्थ एकत्र करून त्याचा दिवा करतात. त्यात फुलवात लावतात.