चिंतन आणि साधनेचे महत्त्व काय?

0
3

गाथा पारायण, कीर्तन महोत्सवात सागर महाराज शिर्के यांनी कीर्तनातून सांगितले महत्त्व..

पिंपरी, दि. १० : चिंतन आणि साधनेचे महत्त्व सांगणाऱ्या काळ सारावा चिंतने.. एकांतवासी गंगास्नाने.. या अभंगावर ह.भ.प. सागर महाराज शिर्के यांचे सोहळ्यातील दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात कीर्तन झाले.
काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षिणा तुळसीच्या ॥१॥
युक्त आहार विहार । नेम इंद्रियांसी सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥
परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥२॥
देह समर्पीजे देवा । भार कांहींच न घ्यावा । होईल आघवा । तुका म्हणे आनंद ॥३॥

जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गाथा पारायण आणि कीर्तन सोहळा श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे आयोजित करण्यात आला आहे. श्री क्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारूतीबाबा कुऱ्हेकर महाराज आणि वारकरी रत्न हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या नेतृत्त्वाखाली या पूर्ण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पारायण सोहळ्यासाठी १५ हजार भाविक वाचक म्हणून सहभागी होत आहेत. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संस्थान, घोरावडेश्वर डोंगर, श्री क्षेत्र भामचंद्र डोंगर, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील वारकरी संप्रदाय यांचा संयोजनात सहभाग आहे.
परमार्थ हे महाधन प्राप्त होण्यासाठी आणि अवघ्या आनंदाच्या प्राप्तीसाठी मनुष्याने काय करावे? यावर जगद्गुरु तुकोबारायांच्या वरील अभंगावर हरिभक्त परायण सागर महाराज शिर्के यांनी अत्यंत सुश्राव्य असे चिंतन सांगितले. महाराज कीर्तनामध्ये असे म्हणाले, की तीन पद्धतीने आपण चिंतन करतो. एक जडाचे चिंतन, दुसरे जीवाचे चिंतन आणि तिसरे देवाचे चिंतन. जडाचे चिंतन केले तर नाश अटळ आहे.
देव जवळ असताना सीतामाईने वनवासात असताना सुवर्णमृगाचे चिंतन केले आणि मग सोन्याच्या लंकेत सहा महिने बंदीवासात राहावे लागले. त्यावेळी त्यांना अनुभव आला की सोन्यासारखा प्रभूरामचंद्र जवळ असताना आपण सुवर्णमृगाचे चिंतनात का अडकलो? म्हणून मनुष्याने देवाचे चिंतन करावे. पण केवळ चिंतनाने देव प्राप्त होत नाही. यासाठी तुकाराम आणि ज्ञानेश्वर महाराज यांचे चिंतन करा. म्हणजे त्यांच्या माध्यमातून आपल्याला देवपण प्राप्त करता येऊ शकते. यासाठी साधना करावी.
यासाठी साधना कशी करावी? तर ती एकांतामध्ये भगवंताचे चिंतन करत करावी. एकांतात गेल्यानंतर तिथे असणाऱ्या वृक्षवेलींशी आपला संवाद साधावा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगोक्तीप्रमाणे आपण निसर्गाशी एकरूप व्हावे. एकांतात जाऊन संसाराचे चिंतन करू नये. मनुष्याने आपल्या आयुष्याचे दिवस हरीच्या चिंतनात एकांत वासात, गंगेची स्नाने करण्यात देवपूजेत आणि तुळशीला प्रदक्षिणा घालण्यात घालवावेत. दररोज गंगेत स्नान करणे आपल्याला शक्य नाही. तर आपल्या घराजवळ जी नदी असेल तिला गंगा मानून आपण त्यात स्नान करावे. ईश्वराची नित्य पूजा करावी आणि नाही नित्य पूजा करता आली तरी.
कोणाही जीवाचा न घडावा मत्सर |
वर्म सर्वेश्वर पूजनाचे ||
किंवा
तया सर्वात्मका ईश्वरा | स्वकर्म कुसुमांचीया वीरा | पूजा केली होय अपारा | तोषालागी ||
या संत वचना प्रमाणे वर्तन करावे.
चिंतन करताना योग्य आहार असावा. प्रमाणापेक्षा कमी नाही आणि प्रमाणापेक्षा जास्तही नाही. प्रमाणापेक्षा कमी आहार घेतला तरी चिंतन होत नाही आणि जास्त घेतला तरी चिंतन होत नाही. म्हणून आहार आणि हातापायांचे व्यवहार परिमित असावेत. ज्ञानेंद्रियांचे व्यवहार देखील नियमित असणे महत्त्वाचे आहे. अतिशय झोप नसावी, बोलणे देखील अधिक नसावे.
परमार्थ हे मोठे धन आहे. देवाचे चरण ही एक मोठी मिळकत आहे. या सर्वांचा लाभ व त्याचे रक्षण होण्याकरता आपण वरील उपाय करावेत. तुकाराम महाराज म्हणतात – देवाला देह अर्पण करावा. आपण त्याच्या अभिमानाचे ओझे घेऊ नये. त्यामुळे सर्व आनंद होईल.
आत्यंत्यिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे अध्यात्मातील ध्येय प्राप्त करण्यासाठी आपला जास्तीत जास्त काळ भगवंताच्या चिंतनात घालवावा.
यावेळी भरतशेठ कड, तुषारशेठ सस्ते, सोपानशेठ खरावी, गोरख महाराज, दत्तो महाराज आव्हाड (सिन्नर), बाळासाहेब मुदगल, कन्हैय्यालाल महाराज रजपूत यांचा शिर्के महाराजांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. खेड तालुक्यातील ग्रामस्थांकडून प्रसादाची सेवा देण्यात आली.