संत एकनाथ महाराज मिशन तर्फे संत एकनाथ महाराजांचे नावे देण्यात येणारे २०२५ चे सहा पुरस्कार जाहीर

0
4

दि . १० ( पीसीबी ) – यंदाचा सर्वोच्च भानुदास एकनाथ पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक व संत तुकाराममहाराजांचे वंशज डॉ सदानंद मोरे यांना जाहीर

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत एकनाथ महाराजांचा प्रसार प्रचार व्हावा या उद्देशाने शांतिब्रह्म श्रीएकनाथ महाराज मिशन, पैठण ही सामाजिक संस्था २००६ पासुन कार्यरत आहे. संस्थे तर्फे आज पर्यंत अनेकानेक उपक्रम राबविण्यात आले असुन २०१८ पासुन संत एकनाथमहाराजांचे नावे दर वर्षी एकुण सहा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येत असल्याचे मिशनचे संस्थापक अध्यक्ष नाथवंशज हभप योगिराज महाराज गोसावी पैठणकर यांनी सांगितले.

यंदाचा सर्वोच्च “भानुदास एकनाथ पुरस्कार” संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व संत तुकाराममहाराजांचे वंशज डॉ सदानंद मोरे यांना देण्यात येणार असुन श्रीफळ, ताम्रपट मानपत्र, नाथांचा फेटा, रुपये पंचवीस हजार, नाथांची मूर्ती, एकनाथी भागवत असे पुरस्काराचे स्वरूप राहील.

संत एकनाथमहाराज ट्रस्टचे संस्थापक व अधिपती नाथवंशज हभप वै. श्री रंगनाथबुवा ऊर्फ भैय्यासाहेबमहाराज पैठणकर यांचे नावाने देण्यात येणारा दुसरा “वारकरी भूषण पुरस्कार” हा नेकनुरच्या बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती हभप लक्ष्मण महाराज मेंगडे यांना देण्यात येणार आहे.

श्री संत एकनाथमहाराज प्रबोधमार्तंड पुरस्कार हा श्रीसंत निवृत्तीनाथमहाराज संस्थानचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध कीर्तनकार हभप संजयनाना धोंडगे यांना, संत एकनाथमहाराज स्वरमार्तंड पुरस्कार हा वारकरी संप्रदायातील जेष्ठ उपासक आळंदी येथिल हभप आबा महाराज गोडसे यांना, संत एकनाथमहाराज तालमार्तंड पुरस्कार हा पुणे येथिल मृदंगाचार्य तुकारामजी भुमकर यांना तर संत एकनाथमहाराज वारकरी सेवा पुरस्कार हा पैठण येथे नाथ समाधी मंदिर परिसरात भाविकांना गेल्या अनेक वर्षांपासुन विनामोबदला सायंकाळी अन्नदानाची सोय करणाऱ्या राजुसेठ लोहिया यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गावातील नाथमंदिर परिसरातील श्रीसंत नरहरी सोनार महाराज संस्थान येथे संपन्न होणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मिशनचे संस्थापक अध्यक्ष नाथवंशज हभप योगिराज महाराज गोसावी पैठणकर यांनी केले आहे.