‘एक तरी यशस्वी पुनर्रोपण दाखवा’; वृक्षतोडीवरून नागरिक आणि पुणे मेट्रो आमने-सामने…

0
66

पुणे : शहरातील मेट्रोच्या प्रकल्पामुळे आतापर्यंत साडेतीन हजार झाडांची कत्तल झाल्याचा दावा ‘चलो पीएमसी/पुणे संवाद’ या संघटनेने केला आहे. यातील ९० टक्के झाडे जुनी होती. त्यांचे वय ४० ते १०० वर्षे इतके होते. ही झाडे तोडल्यामुळे झालेले पर्यावरणीय नुकसान भरून काढण्याचा विचार कोणी केला नाही तसेच एकही झाडाची यशस्वी पुनर्लागवड झाली नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दुसरीकडे संबंधित संघटनेने केलेले आरोप हे अस्पष्ट असल्याचे पुणे मेट्रोकडून सांगण्यात आले. ‘चलो पीएमसी/पुणे संवाद’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘पुणे आयटी सीटी मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या अधिकाऱ्यांना बुधवारी (दि. ५) भेटून यासंदर्भात विचारणा केली.

शहरातील सगळ्या मेट्रो प्रकल्पांमुळे हजारो झाडांची कत्तल झाली. यातील काही झाडांचे वय हे १०० वर्षे इतके होते. ब्रिटिश काळात लावलेली अनेक वडाची मोठी झाडे मेट्रो प्रकल्पासाठी जमीनदोस्त करण्यात आली. मात्र त्यामुळे झालेल्या पर्यावरणीय नुकसानीच्या भरपाईबद्दल विचार होत नसल्याचे दिसून येत आहे.  प्रकल्पासाठी झाडे तोडल्यानंतर नवीन झाडे लावण्याचे आश्वासन मेट्रो प्रशासनाकडून दिले जाते. मात्र जितकी झाडे तोडली गेली त्याच्या वजनाइतकीच लागवड होताना दिसत नाही. थोड्याफार झाडांची टेकड्यांवर किंवा इतर मोकळ्या जागेत लागवड केली जाते. या झाडांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे या झाडांचे जगणे अवघड असते. एकीकडे शहरात प्रदूषण वाढत आहे. धूळ आणि धुरामुळे रस्त्यावरून जाताना श्वास घेणे कठीण होवून बसले आहे.  या प्रदूषणावर केवळ झाडांच्या माध्यमातूनच नियंत्रण ठेवता येऊ शकते. मात्र मेट्रो प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यामुळे झाडांची संख्या कमी होताना दिसत असल्याचे ‘चलो पीएमसी/पुणे संवाद’ संघटनेकडून सांगण्यात आले.

एक तरी यशस्वी पुनर्रोपण दाखवा…

पुणे मेट्रोने तोडलेल्या झाडांपैकी एका तरी झाडाची यशस्वी पुनर्लागवड केल्याचे दाखवून द्यावे. असे एकही उदाहरण शहरात नाही. तसेच वृक्षतोडीमागे कॉर्पोरेट हेतू  दडलेला आहे. राजकीय वजन वापरून अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जातो. त्यामुळे वृक्षतोडीविरुद्ध सर्वसामान्य नागरिकांनी घेतलेल्या हरकतींना  केराची टोपली दाखवली जाते. त्यामुळे नागरिकांकडे कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नसतो, असे ‘चलो पीएमसी/पुणे संवाद’च्या अमित सिंग यांनी म्हटले.

६०० झाडांचे पुनर्रोपण केल्याचा पुणे मेट्रोचा दावा

शहराच्या विकासासाठी मेट्रो प्रकल्प गरजेचा आहे. नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रो हा उत्तम पर्याय आहे. आतापर्यंत पुणे मेट्रोकडून ६०० झाडांचे पुनर्रोपण केल्याचा दावा मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.  तसेच वाचू शकणारी झाडे वाचवली आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानाच्या बाजूची झाडे, तसेच सीओईपी जवळील वडाचे मोठे झाड वाचविण्यात आले. काही ठिकाणी झाड न तोडता त्याची छाटणी करण्यात आली, असे पुणे मेट्रोच्या एका पदाधिकाऱ्याने सीविक मिररशी बोलताना सांगितले.