पिंपरी,दि. ६ – ‘आपली एक छोटीशी कृती देशाला उन्नतीकडे नेते!’ असे विचार महाराष्ट्राचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी मधुरा बँक्वेट हॉल, पुनावळे येथे व्यक्त केले. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, रीजन ३ आयोजित ‘महाकुंभ चैतन्याचा… निरंतर सेवेचा…’ या संकल्पनेवर आधारित रीजन कॉन्फरन्समध्ये प्रमुख वक्ते म्हणून जयंत उमराणीकर बोलत होते. प्रांतपाल एमजेएफ विजय सारडा, रीजन ३ चेअरपर्सन प्रा. शैलजा सांगळे, माजी प्रांतपाल बी. एल. जोशी, राज मुछाल, श्रेयस दीक्षित, राजेश आगरवाल, विभागीय अध्यक्ष प्रीती बोंडे, मीनांजली मोहिते, अनिल भांगडिया, शशांक फाळके, वसंत कोकणे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
विजय सारडा यांनी, ‘सातत्य अन् समर्पण यांतून यश मिळते याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे लायन्स रीजन ३ होय!’ असे गौरवोद्गार काढले. प्रा. शैलजा सांगळे यांनी अहवाल सादर करताना, ‘०३ जुलै २०२४ रोजी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आजतागायत संकल्पित १००० प्रकल्पांचे उद्दिष्ट ओलांडून सुमारे १००४ प्रकल्प पूर्ण झाले असून कला, क्रीडा, संस्कृती, आरोग्य, शिक्षण आणि समाजकार्य अशा विविध क्षेत्रांत सेवाकार्य करण्यात आले. नुकत्याच संपन्न झालेल्या महाकुंभाची चैतन्यदायी संकल्पना अंगीकारून उर्वरित कार्यकाळात सर्वांच्या सहकार्यातून निरंतर सेवेचा महाकुंभ सुचारू ठेवायचा आहे!’ अशी भावना व्यक्त केली.
दीपप्रज्वलन आणि अर्चना सपकाळ यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रणाली चौधरी, शामकुमार माने, रश्मी नायर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. रीजन कॉन्फरन्सनिमित्त फलकप्रदर्शन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संतोष सोनवणे, अभय शास्त्री, राजेंद्र गोयल यांनी फलक स्पर्धेचे परीक्षण केले. उत्कृष्ट कार्याबद्दल शैलजा सांगळे यांना आंतरराष्ट्रीय लायन्स प्रशस्तिपत्रक प्रदान करून सन्मानित करण्यात आले; तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यक्षम सभासदांना सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या संघांना आणि व्यक्तींना पारितोषिके प्रदान करण्यात आली. नीलेश पाटील, हिरामण राठोड आणि अनिल झोपे यांनी संयोजनात विशेष परिश्रम घेतले. अशोक बनसोडे यांनी फलक स्पर्धेचे निवेदन केले. सीमा पारेख आणि अक्षदा टिळक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राजेंद्र काळे यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.