- पादचारी मार्गावरील नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी संबंधित विभागांना दिल्या आवश्यक सूचना
पिंपरी, दि . ४ ( पीसीबी ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी आज, मंगळवारी (४ मार्च) ‘ड’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या विकास आराखड्यातील विकसित केलेल्या रस्त्यावरील करावयाचे वृक्षारोपण आणि दुभाजकामधील वृक्षारोपण याचे देखभाल दुरुस्ती कामांची पाहणी केली. पादचारी नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी रस्त्याच्या बाजुला असणारे पादचारी मार्गावर अतिक्रमण होऊ देऊ नका, रस्ता दुभाजकाची स्थिती चांगली ठेवा, रस्ता दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांची देखभाल करा, अशा सूचनाही अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी संबंधित विभागांना दिल्या.
पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, पादचारी मार्गांवरून नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सातत्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना करण्यात येत असतात. तसेच रस्ता दुभाजक आणि पादचारी मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी झाडांची लागवड करण्यात येत असते. याच अनुषंगाने मंगळवारी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या वाकड येथील उत्कर्ष चौक, पिंक सीटी, कावेरीनगर पोलीस लाईन तसेच ‘ब’ क्षेत्रीय कार्यलयांतर्गत येणाऱ्या गुजरनगर, चिंचवडे चौक, बिर्ला हॉस्पिटल, आकुर्डी येथील रस्ता दुभाजक व पादचारी मार्ग कामाची पाहणी केली. याप्रसंगी उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, स्थापत्य विभागाचे सहशहर अभियंता देवन्ना गट्टूवार, उद्यान अधिक्षक राजेंद्र वसावे, उद्यान विभागाचे पर्यवेक्षक यांच्यासह उद्यान व स्थापत्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड, वाल्हेकर वाडी, आकुर्डी, थेरगाव अशा भागातील विविध रस्त्यांची पाहणी करताना जांभळे पाटील यांनी नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. यामध्ये रस्ता दुभाजकांची वेळोवेळी स्वच्छता करणे, रस्ता दुभाजकांमध्ये झाडांची लागवड करणे, रस्ता दुभाजकांमध्ये असलेल्या झाडांना वेळेवर पाणी देणे, पादचारी मार्गावर शक्य तेथे सावली देणाऱ्या झाडांची लागवड करणे, अशा सूचनांचा समावेश होता.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ आणि ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत झालेल्या नविन रस्त्यांमध्ये करावयाचे वृक्षारोपण आणि रस्ते दुभाजक मधील झाडांची देखभाल या कामांची पाहणी करून आढावा घेण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, पादचारी नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना करीत असते. त्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचनाही संबंधित विभागांना दिल्या आहेत.
- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका