राष्ट्रभान हा टाटा उद्योगसमूहाचा पाया! – डॉ. श्रीपाल सबनीस

0
4

पिंपरी, दि. ४ ‘समाजभान आणि राष्ट्रभान हा टाटा उद्योगसमूहाचा पाया आहे!’ असे विचार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी ऑटोक्लस्टर सभागृह, जुना मुंबई – पुणे हमरस्ता, चिंचवड येथे सोमवार, दिनांक ०३ मार्च २०२५ रोजी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, पुणे आयोजित उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योग पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त वरिष्ठ महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पवार आर. एम. सी. चे संचालक संदीप पवार आणि कोलते प्रेसिंग वर्क्सचे व्यवस्थापकीय संचालक नवनाथ कोलते यांना उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. त्याचबरोबर प्रगती प्रेस टूल्सचे राम काळे (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगभूषण), एएसके इंडस्ट्रीजचे नेताजी पाटील (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगविकास), रूपाली पाटील असोसिएटसच्या रूपाली पाटील (उद्योगमहर्षी रतन टाटा उद्योगसखी), मनोज ढमाले (उद्योगमहर्षी रतन टाटा दुग्ध उद्योगभूषण) आणि पांडुरंग जितकर (उद्योगमहर्षी रतन टाटा सौरऊर्जा उद्योजक) पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘दुर्दैवाने उद्योजकांना खलनायक ठरवले गेले; पण टाटा उद्योगसमूहाचा इतिहास हा विधायक श्रीमंतीचा आणि माणुसकीचा आहे. स्वामी विवेकानंद यांना अपेक्षित असलेली उद्योजकता अन् राष्ट्रनिष्ठा टाटा उद्योगसमूहाने कायम जोपासली. त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारताना उद्योजकांनी श्रीमंत व्हावे पण शोषक होऊ नये!’ सचिन ईटकर यांनी, ‘सचोटी, हातोटी, कसोटी हा मापदंड ठेवून काम करणारा टाटा उद्योगसमूह हा भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. जगातील सर्वात मोठी विकसित अर्थव्यवस्था होण्यासाठी उद्योजकांची संख्यादेखील वाढली पाहिजे!’ अशी अपेक्षा व्यक्त केली; तर मनोहर पारळकर यांनी, ‘उद्योग करणे म्हणजे सतीचे वाण असते!’ असे मत मांडले. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविकातून उद्योजकांना प्रेरणा मिळावी म्हणून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती दिली. परिषदेचे कार्याध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. पुरस्कारांपूर्वी, श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘रतन टाटांना अभिप्रेत असलेला एकविसाव्या शतकातील उद्योजक’ या छोटेखानी व्याख्यानातून एक कामगार ते यशस्वी उद्योगसमूहाचा अध्यक्ष हा रतन टाटा यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास कथन केला.

वृक्षपूजन आणि संगीता झिंजुरके यांनी गायलेल्या “वाद नसाया पाहिजे…” या कवितेच्या गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. महेंद्र भारती, सुप्रिया सोळांकुरे, अरुण गराडे, जयश्री श्रीखंडे, जयवंत भोसले, प्रतिमा काळे, प्रा. प्रभाकर दाभाडे यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. सीमा गांधी यांनी आभार मानले.