“तरुणीवर दोन वेळा अत्याचार, पोलिसांनी बंद शिवशाहीतून ‘आवाजाची टेस्ट’ केली, धक्कादायक कारण समोर”

0
9

दि. ३ ( पीसीबी ) – स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे नवनवीन कारनामे दररोज समोर येत आहेत. ज्यावेळी तरुणीवर अत्याचार झाला, त्यावेळी आरोपीने आपल्याला जिवंत सोडावे, या हेतूने तरुणी गप्प राहिली. याच संधीचा फायदा घेत दत्ता गाडे याने तरुणीसोबत दोन वेळा अत्याचार केला. आपल्याला जिवंत सोडावे यासाठी तरुणीने गयावया केल्याचे तपासात समोर आले आहे.

सुटकेसाठी आवाज दिला

दत्ता गाडे पीडित तरुणीला आपण कंडक्टर असल्याचे खोटे सांगून बसमध्ये घेऊन गेला. ती तरुणी बसमध्ये चढताच त्याने चालकाचा आणि मुख्य दरवाजा बंद केला. तरुणीला संशय आल्याने मला खाली जायचं आहे, मला खाली जाऊ दे, अशी विनवणी ती गाडेकडे करत होती. त्यानंतर गाडे याने तिला बसच्या सीटवर ढकलून दिले. आपली सुटका करून घेण्यासाठी पीडितेने आवाजही दिला, पण संपूर्ण बसच्या काचा बंद होत्या. त्यानंतर त्याने तिचा गळा दाबला. त्यामुळे ती तरुणी घाबरली. ती स्वतःच्या बचावसाठी गयावया करत होती. मात्र, संबंधित तरुणी प्रतिकार करत नसल्याचे लक्षात येताच नराधमाने दुसऱ्यांदा तिच्यावर अत्याचार केला. तू मला जिवंत ठेव अशी तरुणीने विनवणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बसबाहेर आवाज जात नाही

बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांनी शिवशाही बसचा आढावा घेतला होता. संबंधित बस वातानुकूलित होती. त्यामुळे बसला खिडक्या नव्हत्या. पोलिसांनी बसमधून मोठ्याने ओरडून पाहिलं असता, बाहेर आवाज आला नाही, असे दिसून आलं. त्यामुळे तरुणीने आरडाओरडा केला असेल तरीही तो बाहेर ऐकू आला नसेल. अत्याचार होत असताना तरुणी मोठमोठ्याने रडत होती, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

कुटुंबाचा आरोपीला पाठिंबा

धक्कादायक म्हणजे एवढी भयंकर घटना होऊनही गाडे कुटुंबाकडून दत्ता याच्या कृत्याला पाठिंबा मिळताना पहायला मिळत आहे. माझा नवरा भाजीपाला विक्री करण्यासाठी गेला होता. दोघांच्या समतीने हे घडले आहे. पण न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल असे देखील त्याच्या पत्नीकडून सांगितले जात आहे.

बलात्काराचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणीच्या भूमिकेवर विविध स्तरावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. खुद्द गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीही ‘बलात्कार प्रकरणात संघर्ष झाला नाही. तरुणीने आरडाओरडा केला नाही; अन्यथा घटना लवकरच उघडकीस आली असती,’ असे विधान केले होते. मात्र, पोलिसांनी केलेला तपास आणि तरुणीच्या जबाबातून धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. आरोपीने तरुणीची दिशाभूल करून तिला ‘सोलापूर-पुणे’ या शिवशाही बसमध्ये चढायला भाग पाडले आणि त्याने बसमध्ये चढून दरवाजा लावला.