दि. ३ ( पीसीबी ) पुणे: स्वारगेट एसटी डेपोमध्ये एका 26 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. परंतु, गाडे याने गुन्हा कबुल करण्याऐवजी पीडित तरुणीवरच खळबळजनक आरोप केले होते. सदर तरुणीवर कोणतीही बळजबरी केली नाही. उलट तिनेच मला बोलावले आणि त्यानंतरच आम्ही बसमध्ये गेलो. तरुणीने माझ्याकडून साडेसात हजार रुपये घेतले. तसेच घटनास्थळी तरुणीचा एक एजंटही उपस्थित होता. संबंधित तरुणीवर बलात्कार झालाच नाही, जे घडले ते दोघांच्या संमतीने झाले, असा दावा दत्तात्रय गाडे याने वकिलांमार्फत न्यायालयामध्ये केला होता.
त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पत्नीनेही आपल्या नवऱ्याची बाजू उचलून धरली होती. तरुणीवर बलात्कार झाला तर मग तिचे कपडे का फाटले नाहीत? तिच्या अंगावर काही ओरबाडलेल्या खुणा दिसत आहे का? बसमध्ये चढताना आधी तरुणी पुढे गेली आणि माझा नवरा बसमध्ये चढला. त्यानंतर दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का?, असा प्रश्न गाडे याच्या पत्नीने उपस्थित केला होता.
त्यानंतर आता तपासात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याच्या बँक खात्यात बलात्काराच्या घटनेपूर्वी केवळ 249 रुपये शिल्लक होते. त्यामुळे गाडे याच्या वकिलांनी दावा केल्याप्रमाणे तरुणीला शरीरसंबंध ठेवण्यासाठी जे 7500 रुपये देण्यात आले, ते पैसे त्यांच्याकडून कुठून आले, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. गुन्हा केल्यानंतर गाडे याने आपला मोबाईल बंद करून ठेवला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर गाडेयाचे बँक खाते, डिजिटल व्यवहार, ऑनलाईन पेमेंट या सगळ्याची सखोल चौकशी करण्यात आली आहे. गाडे याच्या मोबाईलमधून कोणाकोणाला पैसे ट्रान्सफर करण्यात आले? पीडित तरुणीला पैसे देण्यात आले का? या सर्व बाबींचा तपास पोलिसांनी केला. मात्र, पीडित तरुणी हे कधीही आरोपीच्या संपर्कात नव्हती, हे स्पष्ट झाले आहे. तसेच आरोपी गाडे तरुणीला 7500 रुपये दिल्याचा जो दावा करत आहे, तो देखील खोटा ठरला आहे. कारण या घटनेपूर्वी गाडे याच्या बँक खात्यात फक्त 249 रुपये एवढी रक्कम शिल्लक होती.